कोलकता – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरला मंगळवारी खराब हवामानामुळे इमर्जन्सी लॅंडिंग करावे लागले. लॅंडिगनंतर हेलिकॉप्टरमधून उतरताना ममतांना दुखापत झाली. ती फारशी गंभीर नसल्याचे समजते.
बंगालमध्ये सध्या पंचायत निवडणुकांची प्रक्रिया सुरू आहे.
त्यामुळे तृणमूल कॉंग्रेसच्या प्रमुख असणाऱ्या ममता प्रचारासाठी राज्याच्या उत्तर भागाच्या दौऱ्यावर होत्या. तो दौरा आटोपून कोलकत्याला जाण्यासाठी त्या बागडोगरा विमानतळाकडे निघाल्या. मात्र, खराब हवामानामुळे त्यांचे हेलिकॉप्टर हेलकावे खावू लागले. त्यामुळे पायलटने सिलिगुडीजवळील हवाई तळावर इमर्जन्सी लॅंडिंग करण्याचा निर्णय घेतला.
लॅंडिंगनंतर ममता कारने बागडोगरा विमानतळावर दाखल झाल्या. तिथून त्या विमानाने कोलकताला पोहचल्या. त्यापाठोपाठ त्यांना रूग्णालयात हलवण्यात आले. विविध डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली.
आता काही अहवाल प्राप्त झाल्यानंतर ममतांना उपचारांसाठी रूग्णालयात दाखल करायची गरज आहे किंवा नाही याविषयीचा निर्णय होईल. ममतांना दुखापत झाल्याची माहिती मिळाल्यानंतर राज्यपाल सी.व्ही.आनंद बोस यांनी त्यांना फोन करून प्रकृतीची विचारपूस केली.