पुणे -सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत पीएच.डी. प्रवेश देणाऱ्या सर्व संशोधन केंद्रांचे शैक्षणिक आणि प्रशासकीय तपासणी करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. या तपासणीतून निकष पूर्ण केलेल्या संशोधन केंद्रातच पीएच.डी. प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यामुळे पीएच.डी. प्रवेश देणाऱ्या संशोधन केंद्रातील गैरप्रकारांना पायबंद बसणार आहे.
विद्यापीठाकडून पीएच.डी. प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. मुलाखती पूर्ण झाल्यावर उमेदवारांना प्रत्यक्ष प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. यासाठी विद्यापीठाकडून पुणे, नगर, नाशिक आणि सिल्वासा येथील संशोधन केंद्रांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. त्यातून संशोधन केंद्रातील अद्ययावत स्थिती समोर येणार आहे.
प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी संशोधन केंद्रांचे शैक्षणिक आणि प्रशासकीय तपासणी करण्याचा निर्णय विद्यापीठाच्या अधिष्ठात्यांच्या बैठकीत घेण्यात आला, त्यानुसार सर्व संशोधन केंद्रांची तपासणी करण्यासाठी विद्यापीठाकडून जिल्हानिहाय समिती नियुक्त करण्यात आली आहे. तसेच विद्यापीठाच्या संकेतस्थळावर संशोधन केंद्रांच्या तपासणीचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. दि. 5 ते 15 डिसेंबर दरम्यान सर्व संशोधन केंद्रांचे तपासणी करण्यात येईल. या तपासणीसाठी संशोधन केंद्रांना माहिती सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. संशोधन मान्यता आणि अन्य बाबींची पूर्तता करणाऱ्या आणि समितीने शिफारस केलेल्या संशोधन केंद्रांवरच पीएच.डी.चे प्रवेश करण्यास मान्यता देण्यात येणार असल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.
नावेही जाहीर करावी…
विद्यापीठाने मान्यता दिलेल्या संशोधन केंद्रांकडून अतिरिक्त शुल्क घेतल्यासह अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. या तपासणीतून संशोधन केंद्रातील गैरप्रकार निदर्शनास येण्याची शक्यता आहे. विद्यापीठाने कागदोपत्री तपासणी प्रक्रिया न करता संशोधन केंद्राची मान्यता रद्द बरोबरच त्यांची नावेही जाहीर करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांतून होत आहे.