बंगळुरू – कर्नाटक विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसला बहुमत मिळणार असे भाकित बहुतेक माध्यमांनी जनमत चाचणीच्या आधारे केले आहे. तेव्हापासूनच कॉंग्रेसमध्ये कोण होणार मुख्यमंत्री हा खेळ सुरू झाला आहे. माजी मुख्यमंत्री सिध्दरामय्या आणि कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. शिवकुमार हे या पदासाठी प्रबळ दावेदार आहेत व त्यांच्या समर्थकांमध्ये चढाओढ सुरू असताना कॉंग्रेस श्रेष्ठी त्यांना सबुरीने घेण्याचा सल्ला देत आहेत. या सगळ्या घटनाचक्रात शिवकुमार यांनी आज वेगळाच गुगली टाकत थेट पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचेच नाव मुख्यमंत्रिपदासाठी पुढे केले आहे.
कर्नाटकमध्ये अनेक वेळा कॉंग्रेसचे सरकार आले आहे. मात्र अनुसूचित जाती अर्थात एससी समुदायातील एकही व्यक्ती आतापर्यंत मुख्यमंत्रिपदापर्यंत पाहोचू शकलेली नाही. मल्लिकार्जुन खर्गे जेव्हा प्रादेशिक स्तरावर काम करायचे त्यावेळी म्हणजे 1999, 2004 आणि 2013 अशा तीन वेळी हे पद मिळवण्याचे प्रयत्न केले होते. मात्र त्यांना यश आले नाही. आता शिवकुमार यांनी एससी मुख्यमंत्री या विषयाला तोंड फोडल्यामुळे कर्नाटक कॉंग्रेसमधील हालचाली अधिक गतिमान झाल्या आहेत.
तर शिवकुमार यांनी सिध्दरामय्या यांची याद्वारे कोंडी केली असल्याचेही जाणकारांकडून सांगितले जाते आहे. खर्गे मुख्यमंत्री झाले तर त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची आपली तयारी असल्याचे शिवकुमार यांनी म्हटले होते. त्यातून सिध्दरामय्या आपल्याला मान्य नाहीत असाच संदेश त्यांनी दिला आहे. खर्गे आमचे नेते आहेत, अध्यक्ष आहेत. त्यांच्या हाताखाली काम करण्यात आपल्याला गैर वाटणार नाही. ते राष्ट्राची आणि कर्नाटकची संपत्ती आहेत असेही शिवकुमार यांनी म्हटले आहे.