वडूज -वडूज परिसरात झालेल्या वादळी वाऱ्याने घरे व शेती पिकांसह केळीच्या बागेचे मोठे नुकसान झाले. शहर व परिसरात सात वाजण्याच्या सुमारास जोरदार वादळी वारे वाहू लागले. वादळी वाऱ्यासह ढगही जमून आल्याने विजांचाही मोठा कडकडाट सुरू होता. परिसरात बऱ्यापैकी पाऊस झाला. मात्र, वादळी वाऱ्याने नुकसान केले. जैनुद्दीन उर्फ मुन्नाभाई मुल्ला यांच्या गणेशवाडी रस्त्यावरील घरासमोरच्या शेडवरील पत्रे उडाले.
तसेच शहरातील काही दुकानांचे फलकही वाऱ्याने वाकून पडले होते. वाकेश्वर (ता. खटाव) येथील पांडुरंग रघुनाथ फडतरे यांच्या पुसेगाव रस्त्यावरील केळीच्या बागेचेही वादळी वाऱ्याने नुकसान झाले. बागेतील केळीचे अनेक मोठे खुंट वादळी वाऱ्यामुळे उन्मळून पडले होते. माजी उपसरपंच अनिल कचरे यांच्या गोठ्याचीही वाऱ्याने पडझड झाली. वादळी वाऱ्यामुळे परिसरात काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली.