मुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी आज चित्रपट दिग्दर्शक महेश भट्ट यांचा जबाब नोंदवून घेतला आहे.
यावेळी सांताक्रुज पोलिसांनी जवळपास 2 तास महेश भट्ट यांची कसून चौकशी केली. महेश भट्ट सकाळी 11:30 वाजता सांताक्रुज पोलीस स्टेशनला पोहोचले. यानंतर मुंबई पोलीस झोन 9चे डीसीपी अभिषेक त्रिमुखे यांच्यासह एकूण 3 अधिकाऱ्यांनी महेश यांचा जबाब नोंदवला.
सकाळी साडेअकरा वाजता सुरू झालेली ही चौकशी जवळपास दुपारी अडीच वाजेपर्यत सुरू पोलिसांनी महेश भट्ट यांना चौकशीसाठी बांद्रा पोलीस स्टेशनला बोलावले होते. तेथे माध्यमांनी गर्दी केल्यानंतर महेश भट्ट यांनी पोलीस अधिकाऱ्यांना सांताक्रुज पोलीस स्टेशनला चौकशी करण्याचा आग्रह केला. यानंतर मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांची सांताक्रुज पोलीस स्टेशनवर चौकशी करत जबाब नोंदवला.
मुंबई पोलीस अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणाची प्रत्येक बाजूने चौकशी करत आहेत. आतापर्यंत पोलिसांनी 38 पेक्षा जास्त लोकांचे जबाब नोंदवले आहेत. यात सुशांतचे कुटुंबीय, त्याचे नातेवाईक, आदित्य चोप्रा, सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिचाही समावेश आहे.
दरम्यान, याप्रकरणी चित्रपट निर्माता-दिग्दर्शक करण जोहर यालाही चौकशी समन्स बजावण्यात येईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रविवारी नमूद केले होते.