मुंबई – इतर मागासवर्गीयांचे आरक्षण रद्द झाल्याने खुल्या झालेल्या राज्यातील 32 जिल्ह्यांमधील 106 नगरपंचायतीपैकी 97 नगरपंचायतींचे निकाल हाती आले आहेत. 9 नगरपंचायतींचे निकाल उद्या जाहीर होणार आहेत. भाजपाला 24 नगरपंचायती आणि 416 जागा मिळाल्या असून राष्ट्रवादी कॉंग्रेसला 25 नगरपंचायती आणि 387 जागा मिळाल्या आहेत. तर कॉंग्रेसला 18 नगरपंचायची आणि 297 जागा तसेच शिवसेनेला 14 नगरपंचायती आणि 300 जागा मिळाल्या आहेत. म्हणजे महाविकास आघाडीला एकूण 57 नगरपंचायती आणि 976 जागा तर भाजपाला 24 नगरपंचायती 416 जागा मिळाल्या आहेत.
या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे धनंजय मुंडे, शशिकांत शिंदे, एकनाथ शिंदे, गिरीश महाजन अशा अनेक दिग्गज नेत्यांना फटका बसला आहे. तर दुसरीकडे यशोमती ठाकूर, अब्दुल सत्तार, सुनील शेळके यांच्यासारख्या अनेक नेत्यांना प्रतिष्ठा राखण्यात यश मिळवले. शिवसेनेच्या महेश शिंदे यांनीही साताऱ्यात राष्ट्रवादीच्या शशिकांत शिंदेना धक्का दिला आहे. रोहित पवार, रोहित पाटील यांच्यासारख्या तरुण नेत्यांनीही चमकदार कामगिरी करत ठसा उमटवला आहे.
सोलापूर जिल्ह्यात ओबीसी आरक्षण रद्द होऊनही 32 ओबीसींनी विजयाचा झेंडा फडकावला. माळशिरस तालुक्यात 17 पैकी 12 जागांवर ओबीसी उमेदवार विजयी झाले आहेत तर नातेपुते येथेही 17 पैकी 12 जागांवर ओबीसींनी विजय मिळवला. माढा नगरपंचायत निवडणुकीत 17 पैकी चार जागांवर ओबीसींनी विजय मिळवला.श्रीपूर महाळुंग येथे एक आणि वैरागमध्ये 3 ओबीसी उमेदवार विजयी झाले.
राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस एकमेकांविरोधात लढून सत्तेसाठी एकत्र येऊ शकतात तर स्थानिक पातळीवर कॉंग्रेसला सोबत घेऊन कुडाळ नगरपंचायतीत भाजपा सत्ता स्थापन करू शकते. भाजपाचे वरीष्ठ नेते यासंदर्भात निर्णय घेतील असे भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष आणि गटनेते रणजीत देसाई यांनी सांगितले आहे.
गोंदिया जिल्हा परिषद निवडणुकीत प्रफुल्ल पटेल यांना धक्का बसला असून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर यांचा पराभव झाला आहे. भाजपाचे बी एम पटले विजयी झाले आहेत.
हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ व सेनगाव या दोन्ही नगरपंचायतीच्या एकूण 34 जागांपैकी 14 जागांवर विजय मिळवत शिवसेनेने आघाडी घेतली आहे. कॉंग्रेस 6 तर भाजपा 7 जागांवर विजयी झाले. राष्ट्रवादी कॉंग्रेसला 5 आणि वंचित बहुजन आघाडीने दोन जागांवर विजय मिळवित आपले खाते उघडले.
हिंगोली जिल्ह्यातील दोन्ही नगरपंचायतींमध्ये महाविकास आघाडीने 34 पैकी 25 जागांवर विजय मिळवत भाजपाला मात दिली. औंढा नागनाथ नगरपंचायतमध्ये शिवसेनेने स्पष्ट बहुमत मिळवले. सेनगाव नगरपंचायतीत महाविकास आघाडी सत्ता स्थापन करणार हे स्पष्ट झाले.
काय सांगतोय निकाल –
– भाजपाला 24 नगरपंचायती आणि 416 जागा
– राष्ट्रवादी कॉंग्रेसला 25 नगरपंचायती आणि 387 जागा
– कॉंग्रेसला 18 नगरपंचायती आणि 297 जागा
– शिवसेनेला 14 नगरपंचायती आणि 300 जागा
इतर – 16