श्रीनगर : संपूर्ण जग करोनाशी लढा देत आहे तर सीमेपलीकडून पाकिस्तनाच्या दहशतवादी कारवाया काही केल्या थांबत नाहीत. जम्मू-काश्मीरच्या सोपोर भागात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफच्या तीन जवानांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यामध्ये महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण आले आहे. प्रत्युत्तरदाखल सुरक्षा पथकाने केलेल्या गोळीबारात जैश-ए- मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे.
येथील नूरबाग परिसरात जम्मू-कश्मीर पोलीस व सीआरपीएफचे संयुक्त पथक गस्तीवर असताना दहशतवाद्यांनी या पथकावर गोळीबार केला. दहशतावदी आणि सुरक्षा पथकांमध्ये चकमक झाली. यामध्ये हेड कॉन्स्टेबल राजीव शर्मा, कॉन्स्टेबल सी. बी. भाकरे तसेच कॉन्स्टेबल सत्पाल परमार शहीद झाले. दोघे जण या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना सोपोरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. शहीद झालेल्यातील कॉन्स्टेबल सी. बी. भाकरे महाराष्ट्रातील बुलढाण्याचे सुपुत्र आहेत. राजीव शर्मा हे बिहारमधील वैशालीचे तर परमार हे गुजरातेतील साबरकांठा येथील आहेत.
दरम्यान, गेल्या आठवड्याभरात भारतीय लष्करावर काश्मीरमध्ये झालेला हा तिसरा हल्ला आहे. याआधी पुलवामा जिल्ह्यात झालेल्या हल्ल्यात सीआरपीएफचा एक जवान जखमी झाला होता. शुक्रवारी, चार अतिरेकी काश्मीरमध्ये शिरले होते, त्यातील दोघांना कंठस्नान घालण्यात लष्कराच्या जवानांना यश आलं आहे.