मुंबई :- काँग्रेस कोअर कमिमीच्या बैठकीत मुंबईत ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर रोजी होणाऱ्या बैठकीसंदर्भात चर्चा करण्यात आली. या बैठकीला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांचे दोन प्रतिनिधीही उपस्थित होते. मुंबईत होणाऱ्या बैठकीचा आढावा घेण्यात आला आहे. या महत्वपूर्ण बैठकीतून देशात एक संदेश गेला पाहिजे त्याच्या तयारीवर चर्चा करण्यात आली. मुंबईतील ‘इंडिया’ आघाडीची बैठक देशाला दिशा देणारी ठरेल, असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला.
एमसीए क्लब येथे काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या
बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, राज्यात ३ सप्टेंबरपासून पदयात्रा सुरु होत असून या पदयात्रेची रुपरेषा ठरवण्यात आली आहे. ४८ लोकसभा मतदारसंघातील निरिक्षकांच्या अहवालावरही या बैठकीत चर्चा करण्यात आली. केंद्रात व राज्यातील भाजपा सत्तेला उखडून टाकून काँग्रेसची सत्ता आणणे हाच आमचा प्लॅन आहे.
अजित पवार व शरद पवार भेटीवर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, काँग्रेसमध्ये शरद पवारांबद्दल संभ्रम नाही तर जनतेत संभ्रम आहे. शरद पवार हे मोठे नेते आहेत, निर्णय घेण्यास ते सक्षम आहेत आणि त्यांनी या भेटीवर त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे.
इंडिया आघाडी सोबतच राहणार असल्याचे शरद पवारांनी स्पष्ट केले आहे. या सर्व परिस्थितीवर काँग्रेसचे वरिष्ठ नेते (काँग्रेस हायकमांड) लक्ष ठेवून आहेत, मुंबईतील ३१ तारखेच्या इंडिया बैठकीच्या वेळी ते शरद पवार यांच्याशी चर्चा करतील, असं देखील त्यांंनी यावेळी सांगितले.