मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या 9 मंत्र्यांना खातेवाटप करणार आहेत. यासाठी शिंदे भाजपच्या काही मंत्र्यांची खाती काढून ती राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना सोपवली जाणार आहेत. विशेषतः या प्रकरणी शिंदेसेनेच्या एकाही मंत्र्यांच्या खात्याला हात लावला जाणार नाही. तर राष्ट्रवादीसाठी भाजप नेत्यांना आपल्या खात्यांचा त्याग द्यावा लागणार असल्याची माहिती मिळत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत 40 आमदार आहेत. त्यातील 9 जण मंत्री झाले. त्यापैकी बहुतांश जणांकडे एकच खाते आहे. दुसरे खाते असले तरी ते कमी महत्त्वाचे आहे. याउलट भाजपच्या कॅबिनेट मंत्र्यांकडे 2-3 मोठी खाती आहेत. त्यामुळे खातेवाटपात यापैकी एखाद्या खात्यावर टाच येणार असल्याची शक्यता आहे.
अजित पवारांना “अर्थ’?
भाजपच्या ज्या मंत्र्यांची खाती जाऊ शकतात त्यात स्वतः उपमुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, रवींद्र चव्हाण, अतुल सावे, चंद्रकांत पाटील, मंगलप्रभात लोढा यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री शिंदेंकडे 13, तर फडणवीस यांच्याकडे 7 खात्यांचा प्रभार आहे.
सूत्रांनुसार, शिंदे स्वतःकडे नगरविकास, सामान्य प्रशासन तथा माहिती व जनसंपर्क ही खाती कायम ठेवतील. तर फडणवीस यांच्याकडील अर्थ खाते अजित पवार यांना दिले जाईल. गृह खाते फडणवीस स्वतःकडे ठेवतील, असा अंदाज आहे. प्रस्तावित खातेवाटपात अजित पवार यांना अर्थ खाते मिळाले तरी, त्यांना पूर्ण अर्थसंकल्प मांडता येणार नाही. कारण, पुढील वर्षीच्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ते अंतरिम अर्थसंकल्प मांडतील असा अंदाज आहे.
महाजनांचे 1, लोढांची 2 खाती जाणार?
गिरीश महाजन यांचे वैद्यकीय शिक्षण हे खाते आवडीचे आहे. खातेवाटपात ते त्यांच्याकडून जाऊ शकते. त्यांनी या खात्यासाठी आग्रह धरला, तर अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे ग्रामविकास खाते त्यांच्याकडून जाईल. मंगलप्रभात लोढा यांच्याकडे महिला व बालकल्याण, पर्यटन व कौशल्य विकास ही 3 खाती आहेत. त्यातील एक किंवा दोन खात्यावर त्यांना पाणी सोडावे लागेल.
तसेच, राष्ट्रवादीला रवींद्र चव्हाण यांच्याकडील अन्न व नागरी पुरवठा खाते देखील मिळण्याची शक्यता आहे. यासह, चंद्रकांत पाटील यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण, वस्त्रोद्योग व संसदीय कामकाज ही 3 खाती आहेत. त्यातील एक वा दोन खात्यांवर त्यांना राष्ट्रवादीसाठी पाणी सोडावे लागण्याची शक्यता आहे. त्यात भरीसभर पुण्याचे पालकमंत्रीपदही त्यांच्याकडून अजित पवारांकडे जाण्याची शक्यता आहे.