नवी दिल्ली : देशात एकीकडे करोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी सरकारकडून लसीकरण मोहीम राबवली जात आहे. मात्र कुठे लस नसल्यामुळे लसीकरण केंद्र बंद पडण्याचा प्रकार पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे भाजपच्या एका महिला मंत्र्याने लसीकरणानंतर पीएम केअर फंडाला दान करण्याचे अजब आवाहन केले आहे.
करोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर 500 रुपये पीएम केअरला दान करा असे आवाहन मध्य प्रदेशच्या पर्यटन मंत्री उषा ठाकूर यांनी केले आहे. त्यांच्या या अजब आवाहनामुळे सोशल मीडियावर त्यांच्यावर टीका होताना पाहायला मिळत आहे.
उषा ठाकूर या शिवराज सिंह चौहान यांच्या सरकारमध्ये पर्यटन मंत्री आहेत. इंदूरमध्ये ठाकूर म्हणाल्या की, ‘करोनामुळे प्रत्येक क्षेत्राला फटका बसला आहे. करोनाला संपवण्यासाठी लसीकरणास सुरूवात झाली आहे. एका कोवॅक्सीनची किंमत 250 रुपये इतकी आहे. तर दोन डोसची किंमत 500 रुपये इतकी आहे. देवाने आपल्याला खुप काही दिले आहे.’ त्यामुळे ज्यांना शक्य आहे, त्यांनी करोना प्रतिबंधक लसींचे दोन डोस घेतल्यानंतर पीएम केअर फंडमध्ये 500 रुपयांचे दान करावे असे आवाहन ठाकूर यांनी केले आहे.
सरकार करदात्यांच्या पैशांनी लसीकरण करत असून परत सामन्य नागरिकांनी पैसे देणे हे चुकीचे असल्याचे नेटकर्यांनी म्हटले आहे. तसेच लसीसाठी पुन्हा 500 रुपये द्यावे लागत असतील तर मोदींचा फोटो हटवा असेही नेटकर्यांनी कमेंट बॉक्समध्ये म्हटले आहे.