पुणे – शहरातील मेट्रोच्या कामात “महामेट्रो’ने कर्वेरस्ता, बंडगार्डन तसेच नगर रस्त्यावर तब्बल 8 ठिकाणी पावसाळी वाहिन्यांचे नुकसान केले होते.महामेट्रोला वारंवार सूचना देऊनही पावसाळी वाहिन्यांचे काम होत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या सर्व ठिकाणी पाणी साचणार नाही, यासाठी 31 मेपर्यंत उपाययोजना करण्याचे आदेश खुद्द मनपा आयुक्त विक्रमकुमार यांनी दिले होते. मात्र, महामेट्रोने हे काम करण्यास नकार दिल्याने आता महापालिकाच हे काम करणार आहे. तसेच या कामाचे पैसे महामेट्रकडून वसूल केले जाणार आहेत.
वनाज ते रामवाडी मार्गावर मेट्रोचे काम सुरू आहे. हा मार्ग पौड रस्ता, कर्वे रस्ता, बंडगार्डन रस्ता, नगर रस्ता, कल्याणीनगर आणि पुढे पुन्हा नगर रस्ता असा आहे. यातील बहुतांश मार्ग रस्त्याच्या मध्यभागी असला, तरी मेट्रोची स्थानके आणि डेपो असलेल्या भागांत रस्त्याच्या मध्यात किंवा दोन्ही बाजूंनी खांब घेण्यात आले. हे खांब पावसाळी वाहिन्यांच्या मधोमध आले आहेत. परिणामी, या वाहिन्या “ब्लॉक’ झाल्या आहेत. धक्कादायक म्हणजे या सर्व ठिकाणी “महामेट्रो’ने वाहिन्यांवरील चेंबरही बुजवले आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यास जागाच राहिलेली नाही. तर, स्थानक परिसरांत सखल दोन्ही बाजूंनी कॉंक्रीटीकरण, मधोमध दुभाजक असल्याने पाणी साचत आहे. महापालिकाच ही कामे करणार आहे. तसेच, त्याचे बील महामेट्रोला दिल्या जाणाऱ्या निधीतून कमी केले जाणार आहे.
या ठिकाणी महापालिकाच करणार काम
कोथरूड मेट्रो डेपोसमोरील पौड रस्ता
डेक्कन बसस्थानक परिसर
रूबी हॉलसमोरील बाजू
कल्याणीनगर स्थानक
येरवडा बसस्थानक
पौड फाटा पोलीस चौकी
आयडियल कॉलनी स्थानक
मेट्रोची दमबाजी
महापालिकेने आठ ठिकाणांची यादी तसेच त्या ठिकाणी महामेट्रोने पावसाळी वाहिन्यांचे कसे नुकसान केले आहे, हे निदर्शनास आणून दिल्यानंतरही महामेट्रोने महापालिकेच्या ड्रेनेज विभागालाच खोटे ठरविले आहे. या ठिकाणी कुठेही पावसाळी चेंबर अथवा पावसाळी वाहिन्या आम्हाला काम करताना आढळलेल्या नाहीत. तसेच महामेट्रोने केलेली कामे योग्य असून या जागांवर नंतर पालिकेने केलेली कामे चुकलेली असल्याचे सांगत ही कामे करून देण्यास नकार दिला असल्याचे महापालिकेच्या ड्रेनेज विभागाकडून सांगण्यात आले.