नाशिक – राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी आरक्षणाच्या मुद्यावरून सत्ताधारी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. कॉंग्रेसने आरक्षणाच्या मुद्यावरून आजपर्यंत खेळवत ठेवले. आता तेच काम भाजप करत आहे. भाजपही आता कॉंग्रेससारखी वागत आहे, असे जानकर यांनी म्हटले आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे भाजपसाठी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच जड ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
जानकर येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, मराठा समाजासह धनगर समाजालाही आरक्षण मिळाले पाहिजे. आरक्षणाच्या मुद्यावर आजपर्यंत कॉंग्रेसने आम्हाला खेळवत ठेवले. तेच काम आता भाजप करत आहे. भाजपही सध्या कॉंग्रेससारखेच वागत आहे. जानकरांनी यावेळी केंद्रातील सत्ताधारी भाजपला आरक्षणाच्या मुद्यावर एक विधेयक आणण्याचाही सल्ला दिला.
जानकर यांनी यावेळी धनगर आरक्षणाच्या मुद्यावरून विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्यावरही निशाणा साधला. नरहरी झिरवळ घटनात्मक पदावर आहेत. त्यांना आरक्षणाच्या मुद्यावर काहीही बोलणे शोभत नाही. त्यांनी हा मुद्दा संयमाने घ्यावा. ते लोकप्रितनिधी आहेत. कोणत्याही जाती धर्मात मतभेद न करताना सर्वांना आरक्षण दिले पाहिजे, असे ते म्हणाले.
भुजबळांची पाठराखण –
जानकरांनी यावेळी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची पाठराखणही केली. भुजबळ ओबीसी समाजाचे माईलस्टोन नेते आहेत. त्यांना जीवे मारण्याची धमकी देणे चुकीचे आहे. ते आमचे दैवत आहेत. त्यांना धमकी दिली तर बाकीचा समाज गप्प बसणार नाही. त्यांना धमकावण्याच्या भानगडीत पडू नका. कायद्याने आरक्षण मिळवण्याचा प्रयत्न करा, असे जानकर म्हणाले.