महाबळेश्वर, (प्रतिनिधी) – महाबळेश्वर तालुक्याची अर्थवाहिनी म्हणून ओळखल्या जाणार्या दि महाबळेश्वर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीचे बिगुल अखेर वाजले. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी अनेकांनी केलेल्या प्रयत्नांना अपयश आले. त्यामुळे 3 मार्च रोजी निवडणूक होणार आहे.
बँकेच्या संचालक मंडळाच्या 13 जागांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी मंगळवारी (दि. 20) 27 अर्ज शिल्लक राहिल्याने निवडणूक होणार, हे निश्चित झाले आहे.
या निवडणुकीतून दहा उमेदवारांनी अर्ज मागे घेतली. त्यामुळे सर्वसाधारण प्रवर्गातील आठ जागांसाठी माजी अध्यक्ष दत्तात्रय वाडकर, राजेश कुंभारदरे, समीर सुतार, युसुफ शेख, चंद्रकांत बावळेकर, बाळकृष्ण कोंढाळकर या विद्यमान संचालकांसह सतीश ओंबळे, विजय साळवी, राजेंद्र पवार, गजानन फळणे, शरद बावळेकर, नदीम शारवान, इरफान शेख, संपत जाधव, सैफ वारुणकर, असे 15 उमेदवार रिंगणात उरले आहेत.
महिला राखीव प्रवर्गातील दोन जागांसाठी उषा मनोहर ओंबळे, मेघा सुहास ढेबे, अर्चना संतोष पाटणे व मनीषा सुनील पारठे, इतर मागास प्रवर्गातील एका जागेसाठी सचिन धोत्रे व जावेद वलगे दोन विद्यमान संचालकांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. अनुसूचित जातीजमाती प्रवर्गातील एका जागेसाठी विद्यमान संचालक नंदकुमार वायदंडे, अनिल साळुंखे, विजय गायकवाड व किरण शिंदे यांच्यात, तर भटक्या जाती विमुक्त जमातीच्या एका जागेसाठी प्रशांत कात्रट व मनोज ढेबे यांच्यात लढत होणार आहे.