नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्यात मागच्या आठवड्यात एक संतापजनक घटना घडली होती. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.या व्हिडिओत एका मुजोर तरुणाने एका गरीब मजुराच्या अंगावर लघुशंका केली असल्याची संतापजनक कृती केल्याचे दिसत होता. आरोपीने पीडित तरुणाच्या अंगावर, तोंडावर आणि डोक्यावर लघुशंका केली.या प्रकरणी राज्य सरकार आणि पोलिसांनी तत्काळ कारवाई करत प्रवीण शुक्ला या आरोपीला अटकही केली. यावरून तेथे राजकीय आरोप-प्रत्यारोपही झाले आहे. मात्र, सर्व प्रकरानंतरही या प्रकरणातील पीडित असलेल्या दशमत रावत यांनी राज्य सरकारकडे वेगळीच मागणी केली आहे.
या प्रकरणातील आरोपी “प्रवीण शुक्ला याला माफ करा, त्याला सोडून द्या”, अशी मागणी आदिवासी समाजातील दशमत रावत यांनी राज्य सरकारकडे केली आहे. प्रवीण शुक्ला याला त्याची चूक कळली आहे, त्यामुळे त्याच्यावरील गुन्हे मागे घेण्यात यावेत अशी विनंती दशमत रावत यांनी केली आहे.
“सरकारला माझी विनंती आहे की प्रवीण शुक्लाकडून चूक झाली असून आता त्याची आता सुटका करावी. जे काही घडलं, त्याला त्याची चूक लक्षात आली आहे”, अशी प्रतिक्रिया दशमत रावत यांनी प्रसिद्धी माध्यमांना शुक्रवारी दिली. दरम्यान, तुम्ही सरकारकडे अजून काय मागणी करणार आहात असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता ते म्हणाले की, “गावात रस्ता बांधून देण्याची मी विनंती करेन”, असं ते म्हणाले.
संतापजनक: मध्यप्रदेशात एका मुजोर तरुणाने आदिवासी मजुराच्या अंगावर लघुशंका केलीये. आरोपी तरुण भाजपाशी संबंधित असल्याची माहिती मिळतेय…@ChouhanShivraj @BJP4MP pic.twitter.com/QMpOEhvZPl
— Ravindra Mane (@i_am_Ravindra1) July 4, 2023
दरम्यान, प्रवीण शुक्ला नावाच्या इसमाने आदिवासी समाजातील दशमत रावत या व्यक्तीवर लघुशंका केली. हा प्रकार व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर व्हायरल झाला. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांपर्यंत ही खबर पोहोचली. परंतु, हा व्हिडीओ नक्की कुठला आहे हे स्पष्ट होत नव्हते. अखेर हा व्हिडीओ मध्य प्रदशातील सिधी जिल्ह्यातील असल्याचं स्पष्ट होताच तेथील पोलीस सक्रिय झाले. त्यांनी प्रवीण शुक्लाला तत्काळ अटक करून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. तो सध्या आता तुरुंगात आहे.
हे प्रकरण उजेडात येताच मध्य प्रदेशात राजकीय वातावरणही तापलं आहे. तिथे येत्या डिसेंबरपर्यंत निवडणुका लागण्याची शक्यता असल्याने विरोधकांनी सरकावर हल्लाबोल केला. दरम्यान, प्रवीण शुक्ला हा भाजपाचा कार्यकर्ता असल्याचाही दावा विरोधकांकडून करण्यात आला. तर, दुसरीकडे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दशमत रावत यांचे पाय धुतले. या प्रकरणाला विरोधकांनी मुख्यमंत्र्यांचे ढोंग संबोधले आहे. दरम्यान, प्रवीण शुक्लाच्या घरावरही बुलडोझर फिरवण्यात आला आहे.