भोपाळ: करोनाबाधितांच्या संख्येने गुरूवारी 1 हजारचा टप्पा ओलांडला. करोनाबाधितांच्या संख्येत ते राज्य देशात पाचव्या स्थानी आहे. देशातील सर्वांधिक करोनाबाधितांची नोंद महाराष्ट्रात झाली आहे. त्याशिवाय, दिल्ली, तामीळनाडू आणि राजस्थान या राज्यांमध्ये करोनाचा संसर्ग झालेले 1 हजारहून अधिक रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे हजारचा टप्पा ओलांडणारे मध्यप्रदेश हे देशातील पाचवे राज्य बनले आहे.
मध्यप्रदेशात आतापर्यंत करोना संसर्गामुळे 50 हून अधिक रूग्णांचा मृत्यू झाला आहे. त्या राज्यातील इंदूर शहर आणि जिल्ह्यात करोनाने सर्वांधिक कहर केला आहे. त्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 700 च्या आसपास आहे. इंदूर जिल्ह्यात करोना संसर्गामुळे 39 रूग्ण दगावले आहेत. त्यामुळे देशातील करोना हॉटस्पॉटमध्ये इंदूरचा समावेश करण्यात आला आहे. मध्यप्रदेशातील 6 रूग्ण आतापर्यंत करोनामुक्त झाले आहेत. त्या राज्यातील 52 पैकी 26 जिल्ह्यांत करोनाचा फैलाव झाला आहे. त्यामुळे करोनावर मात करण्यासाठी मध्यप्रदेशातील यंत्रणांना वेगाने पाऊले उचलावी लागत आहेत.