मुंबई – भोंग्याच्या वादाने भोंगा विक्रेत्यांचे अच्छे दिन सुरू झाल्याचे चित्र आहे. राज ठाकरे यांनी मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्यात मशिदींवरील भोंग्याच्या विरोधात भोंगे लावून हनुमान चालिसा लावण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर भोंग्याच्या विक्रीत वाढ झाली आहे.
राज ठाकरे यांच्या आवाहनानंतर काही दिवसात मनसे कार्यकर्त्यांकडून हनुमान चालीसा लावण्यासाठी भोंग्यांची खरेदी सुरू झाली. त्यामुळे भोंग्यांची विक्री 30 ते 40 टक्के वाढली. मार्केटमध्ये छोटे भोंगे 400 रुपयांपासून ते मोठे भोंगे 900 रुपयांपर्यंतच्या किंमतीला विक्रीसाठी उपलब्ध आहेत. एरवी लग्न समारंभ आणि सणांसाठी भोंग्यांची खरेदी होत होती. मात्र आता मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते भोंगे खरेदीसाठी येत आहेत. भोंग्यांची विक्री वाढल्याने व्यापारी खुश आहेत.
हनुमान चालिसा पठणासाठी तसेच दुसरीकडे कोरोनाचे निर्बंध शिथिल केल्याने गावोगावी, जत्रा, यात्रा, हरिनाम सप्ताह आणि इतर धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात सुरू आहेत. त्यामुळेही भोंग्याची विक्री वाढल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली आहे. दरम्यान भोग्यांसोबतच हनुमान चालिसा पुस्तकाचीही मागणी वाढली आहे.