हडपसरमधील सायकल ट्रॅक हरवले आहेत?

– विवेकानंद काटमोरे

हडपसर – स्वारगेट बीआरटी मार्गावर महापालिकेतर्फे 2006 मध्ये सायकल ट्रॅक तयार करण्यात आला. मात्र, या मार्गावरून इतर वाहने धावत असल्याने या कामाचा उद्देश तर मागे पडलाच आहे शिवाय यासाठी खर्च करण्यात आलेले कोट्यवधी रुपयेही वाया गेले आहेत. विशेष, म्हणजे अशा मार्गावर व्यावसायिकांनी अतिक्रमणे झाल्याने महानगरपालिकेने चांगली सोय करून ठेवली आहे, अशी स्थिती निर्माण झाली आहे. सायकल ट्रॅक नेमका कुणासाठी, असा प्रश्‍न यातून उपस्थित होत आहे.

सायकलींचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरास गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रशासनाने कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेले सायकल ट्रॅक हडपसर परिसरात कागदावरच उरले आहेत. बहुतांशी ट्रॅक नादुरुस्त असून अनेक ठिकाणी सायकल ट्रॅकवर पार्किंग व अतिक्रमण वाढली आहेत. पुणे-सोलापूर महामार्गावर फातिमानगर चौक ते गांधी चौक दरम्यान वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी बीआरटी मार्गाचा प्रयोग सर्वप्रथम करण्यात आला. परंतु, तो निरूपयोगी ठरत असताना त्याचवेळी येथे उभारण्यात आलेला सायकल ट्रकही आता नावापुरता राहिला आहे. सायकल ट्रॅकवरून दुचाकी वाहने सर्रासपणे धावत असताना काही विक्रेत्यांनी आपली दुकानेही अशा ट्रॅकवर थाटली आहेत.

येथील पादचारी मार्गावर तसेच सायकल ट्रकवर केबल कंडेन्सरही उघडे पडले आहेत. त्यामुळे सायकलस्वार नव्हे तर अगदी पादचाऱ्यांना येथून जाताना धोका निर्माण झाला आहे. मेगा सेंटर व अण्णासाहेब मगर रुग्णालयाकडे जाणारी चारचाकी व दुचाकी वाहने येथील बीआरटी मार्गावरील सायकल ट्रक व पादचारी मार्गावरूनच जातात. फातिमानगर चौक ते गांधी चौकापर्यंत सायकल ट्रक, पादचारी मार्ग तसेच रस्त्याच्या मधोमध मोठ्या दुभाजक असल्याने रस्ता अरुंद झाला आहे. या अरुंद रस्त्यातून मार्ग काढण्यासाठी दुचाकी व चारचाकी वाहने येथील सायकल ट्रॅक वरून धावत असल्याचे वास्तव आहे.

सायकल ट्रॅकचा खर्च वाया…
माजी महापौर व नगरसेविका वैशाली बनकर यांनी कोरिया देशाच्या धर्तीवर सायकलसाठी स्वतंत्र अशी मार्गिका असलेला एक किलोमीटरवर सायकल ट्रॅक केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या सायकल ट्रॅकवर सायकल चालवून त्यांचे उद्‌घाटन केले होते. मात्र, सध्या या सायकल ट्रॅकवर दुचाकी, चारचाकी वाहने तसेच खासगी स्कुल बसेस, टेम्पो व अवजड वाहने रात्रंदिवस उभी केली जात असल्याने सायकल ट्रॅक म्हणजे फुकटले वाहनतळच झाले आहे. सायकलवरून शाळेत जाणारे विद्यार्थी आणि कामावर जाणारे कामगार यांना मुख्य रस्त्यावरून सायकल चालवावी लागत आहे.

सायकल ट्रॅकचा मूळ उद्देशच बाजूला पडला असून हा खर्च वाया गेला आहे. सायकल ट्रॅकवर वाहने उभी करू नयेत, नो पार्किंग, सायकल सोडून इतर वाहनांनी सायकल ट्रॅकचा वापर करू नये, अशा सूचना देणारे फलक सायकल ट्रॅकवर ठिकठिकाणी लावलेले असताना याकडे दुर्लक्ष केले जात आहे. सायकल ट्रॅकवरील अडथळे पाहून मुख्य रस्त्यावरूनच सायकलस्वर सायकल चालवित आहेत. शहरातील सायकल ट्रॅकची अवस्था सर्वत्र अशीच असल्याने महानगरपालिकेने राबविलेली स्मार्ट सायकल योजनाही यामुळेच फेल ठरली असल्याचे उघड आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.