Amit Jain : जगातील अनेक उद्योजकांनी अतिशय खडतर परिस्थितीतून मोठे यश संपादन केले आहे. मात्र यासाठी हवी ती म्हणजे जिद्द आणि हिम्मत. आज आपण CarDekho.Com चे सह-संस्थापक आणि सीईओ अमित जैन यांच्या यशाबाबत अधिक माहिती जाणून घेणार आहोत. अमित यांनी कठोर परिश्रम करत मोठे यश संपादन केले आहे. CarDekho.com ही युनिकॉर्न कंपनी सुरू करण्याआधी अमित यांनी अनेक मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये काम केलं आणि आपला कौटुंबिक व्यवसाय पुढे नेला. मात्र, कौटुंबिक व्यवसायात ते यशस्वी होऊ शकले नाही.
अमित जैन हे रतन टाटा यांना त्यांचे प्रेरणास्थान आणि मार्गदर्शक मानतात. अमित जैन यांचा जन्म १२ नोव्हेंबर १९७६ रोजी जयपूर येथे झाला. अमित जैन यांचे वडील आरबीआयमध्ये अधिकारी होते. दागिन्यांचाही त्यांचा कौटुंबिक व्यवसाय होता. अमित जैन आणि त्यांचे भाऊ वेगवेगळ्या कंपनीत काम करत होते.
अमित यांनी सुरुवातीला टीसीएसमध्ये सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून काम केले. यानंतर त्यांनी ट्रिलॉजीमध्येही काम केलं. मात्र वडिलांची तब्येत बिघडल्याने दोन्ही भाऊ नोकरी सोडून भारतात परतले. त्यानंतर त्यांनी काहीतरी नवीन करण्याचा निर्णय घेतला. अमित जैन आणि त्यांच्या भावाला शेअर मार्केटमध्ये सुमारे १.५ कोटी रुपयांचा आर्थिक फटका बसला होता. मात्र, त्यांनी हार न मानता पुन्हा सुरुवात केली. आज अमित जैन यांची स्वतःची संपत्ती आज २,९०० कोटी रुपये आहे.
कशी केली सुरुवात?
अमित जैन आणि त्यांच्या भावानं मिळून २००७ साली ‘गिरनारसॉफ्ट’ ही आयटी सेवा कंपनी सुरू केली. गिरनारसॉफ्टमध्ये ऑर्डर मिळवण्यासाठी त्यांनी अनेक कंपन्यांना ई-मेल पाठवले. मोठ्या प्रयत्नांनंतर त्यांना ५० हजार रुपयांची पहिली ऑर्डर मिळाली. अमित जैन आणि त्यांच्या भावाला वाहनांची आवड होती, म्हणूनच ते २००८ मध्ये दिल्लीच्या प्रगती मैदानावर आयोजित इंटरनॅशनल ऑटो एक्सपोला गेले होते. येथे त्यांना वेगवेगळ्या कार्सबद्दल माहिती मिळाली. यानंतर त्यांनी २००८ मध्ये CarDekho नावाचं पोर्टल सुरू केले होते.