पुणे – गंभीर गुन्हे दाखल असलेल्या दोन अट्टल गुन्हेगारांना लोणीकंद पोलिसांच्या तपास पथकाने दोन गावठी कट्टे व सहा जिवंत काडतुसासह सापळा रचुन जेरबंद केले. ते गावठी कट्टे विक्रीसाठी येणार असल्याची खबर मिळाल्यावर ही कारवाई करण्यात आली.
महेश तानाजी घोगरे ( रा.संतोष नगर, कात्रज, मुळ रा.मु.पो.आर्वी, वडाची वाडी ता हवेली, जि पुणे ) आणि मंजय रामचंद्रप्रसाद साह ( रा.भोसरी, सदगुरु नगर, पुणे मुळ रा. जियान, थाना.मुफसील, ता. जि. शिवान, रा. बिहार ) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार 10 एप्रिल रोजी पोलीस उप निरीक्षक सुरज किरण गोरे पथकासह हद्दीत गस्त घालत असताना अंमलदार बाळासाहेब सकाटे यांना खबर मिळाली कि, दोन इसम हे गावठी कट्टे विक्री करीता लिबर्टी बेकरी जवळ कोलवडी, केसनंद थेऊर रोड येथे येणार आहेत. त्यानूसार पोलिसांनी केसनंद थेऊर रोड येथे सापळा रचून महेश तानाजी घोगरे आणि मंजय रामचंद्रप्रसाद साह यांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता महेश याचे शर्टाचे खाली कंबरेला डावे बाजुस एक सिल्वर रंगाचे गावठी पिस्तुल मिळून आले व त्याचे पॅन्टचे खिशात तीन जिवंत काडतुसे मिळून आले.
तसेच मंजय याचे शर्टाचे खाली कंबरेला डावे बाजुस एक सिल्वर रंगाचे गावठी पिस्तुल व त्याचे पॅन्टचे खिशात तीन जिवंत काडतुसे मिळून आली. त्यांच्यावर लोणीकंद पोलीस ठाण्यात आर्म ऍक्टनूसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींच्या रेकॉर्डची पडताळणी केली असता महेश हा मोक्कातील आरोपी असून त्याचेवर राजगड पोलीस स्टेशन , वारजेमाळवाडी पोलीस स्टेशन,तसेच भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत. तसेच मंजय याचेवर चाकण पोलीस स्टेशन येथे आर्म ऍक्ट प्रमाणे गुन्हा नोंद आहे.
सदर कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्ष गजानन पवार , पोलीस निरीक्षक तटकरे , पाटील यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस उप निरीक्षक सुरज किरण गोरे, सफी मोहन वाळके, पोलीस अंमलदार बाळासाहेब सकाटे, कैलास साळुके, विनायक साळवे, अजित फरांदे, सुधीर अहिवळे, सागर शेडगे, पांडुरंग माने, अमोल ढोणे, बाळासाहेब तनपुरे, साई रोकडे, दिपक कोकरे यांनी केलेली आहे.