मुंबई – भारतात पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर आयपीएल स्पर्धा अन्य देशात हलवण्यात येणार असल्याचे वर्तवले जात होते. मात्र, आयपीएलचे संचालक अरुण ठाकूर यांनी स्पर्धा भारतातच होणार असल्याचे सांगितले आहे. याबाबत बीसीसीआयने अद्याप अधिकृत घोषणा केलेली नसली तरीही लिलावाच्या वेळी सर्व चित्र स्पष्ट होणार आहे.
भारतात पुढील वर्षी एप्रिल किंवा मे महिन्यात आयपीएल स्पर्धा होत आहे. त्याच कालावधीत देशात लोकसभेच्या निवडणुकाही घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे स्पर्धेसाठी सुरक्षा पुरवणे शक्य होणार नसल्याने ही स्पर्धा 2009 सालाप्रमाणे अन्य देशात हलवण्यात येणार असल्याचे संकेत बीसीसीआयने काही दिवसांपूर्वी दिले होते. मात्र, त्याबाबत ठाकूर यांनी खुलासा केला आहे. लोकसभा निवडणुकीचा आयपीएलवर परिणाम होणार नाही. बीसीसीआयसाठी आयपीएल इतकी महत्त्वाची आहे की त्यासाठी त्यांनी विश्वकरंडक स्पर्धेनंतर पुढील वर्षीच्या विविध स्पर्धांचे वेळापत्रकही बदलले आहे.
दक्षिण आफ्रिका व अमिरातीचा पर्याय
लोकसभेच्या निवडणुकांचा कालावधी व स्पर्धेचा कालावधी एकच असेल तर आयत्या वेळी गोंधळ होऊ नये यासाठी बीसीसीआयने दक्षिण आफ्रिका व अमिराती हे दोन पर्याय खुले ठेवले आहेत. 2009 सालची स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत खेळवली गेली होती, तसेच 2014 सालच्या स्पर्धेतील पहिला लीग अमिरातीत खेळवला गेला होता. तसेच करोना काळातही 2020 सालचे सामने अमिरातीतच खेळवले गेले होते. सध्या तरी निवडणुकांचा निश्चित कालावधी ठरला नसल्याने बीसीसीआय ही स्पर्धा भारतातच घेण्याबाबत आशावादी आहे.