Lok Sabha Election 2024 । निवडणूक आयोगाकडून 18व्या लोकसभा निवडणुकीची घोषणा शनिवार, दि. 16 मार्च रोजी केली जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीची बैठक आज दुपारी घेण्यात आली.
कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या अध्यक्षतेखालील शोध समितीची बुधवारी संध्याकाळी बैठक झाली होती. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या घोषणेचे काउंटडाऊन सुरू झाले आहे.
निवडणूक आयोगातील सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, 18 व्या लोकसभा निवडणुकीची घोषणा शनिवार दि. 16 मार्च रोजी दुपारी चार वाजता केली जाणार आहे.
आयोगाकडून पत्रकार परिषदेत ही घोषणा केली जाईल. 2019 मध्ये 10 मार्चला लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली होती. निवडणूक आयोगाने जम्मू-काश्मीर दौऱ्यानंतर या तारखा जाहीर करण्याचे संकेत दिले होते.
अशा स्थितीत आयोगाचा 12 आणि 13 मार्चचा दौरा काल संपला आहे. आयोगाने 16 आणि 17 मार्चचे दोन दिवस राखून ठेवले आहेत. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना शहराबाहेर न जाण्यास सांगितले. निवडणूक आयोगाने 2019 च्या लोकसभा निवडणुकीची घोषणाही रविवारी केली होती.
दरम्यान, ज्या प्रकारे निवडणुकीच्या हालचाली वाढल्या आहेत, त्यावरून लोकसभा निवडणुकीची घोषणा केव्हाही होऊ शकते, हे स्पष्ट होत आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेससारख्या पक्षांनी आतापर्यंत त्यांच्या उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर केल्या आहेत.
तसेच येत्या काही दिवसांत लोकसभा निवडणुकीच्या घोषणेसह इलेक्टोरल बाँड्सशी संबंधित माहिती सार्वजनिक करण्यासाठी निवडणूक आयोगावर येणारा दबावामुळे आयोगावर पुढील काही दिवस कामाचा व्याप वाढला आहे. । Lok Sabha Election 2024