नगर – आमदार नीलेश लंके यांनी अखेर तुतारी हाती घेण्याचा ठाम निर्णय घेतला असून आज त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पाठविला आहे. त्यामुळे अहमदनगर लोकसभा मतदारसंघात ते महाविकास आघाडीतर्फे शरद पवार गटाकडून निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपचे विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे यांच्या विरोधात आ. लंके निवडणूक लढविणार असल्याने ही निवडणूक आता चुरशीची होणार आहे. (Lok Sabha Election 2024 MLA Nilesh Lanke Resigns, Sujay Vikhe Vs NIlesh Lanke fight in Ahmednagar)
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत होणार असल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले होते. मात्र, महाविकास आघाडीकडून आ. लंके हे उमेदवार असतील का? याबाबत शंका व्यक्त होत होती. आ. लंके यांनी तसे यापूर्वी लोकसभेचे संकेत दिले होते. मात्र, उमेदवार कोण? असा प्रश्न होता. गेल्या तीन ते चार वर्षांपासून लंके हे लोकसभेचे उमेदवार म्हणून चर्चेत होते. मात्र, ते उमेद्वार असतील का? याबाबत उलटसुलट चर्चा होती. त्यांच्या पत्नी माजी जिल्हा परिषद सदस्या राणीताई लंके यांचे नाव पुढे होत होते.
मात्र, आज खर्या अर्थाने आ.लंके हे उमेदवार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पारनेर तालुक्यातील सुप्यात कार्यकर्ते व पदाधिकार्यांच्या बैठकीत आ. लंके यांनी आज आपण आमदारकीचा राजीनामा देत असून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार राहणार असल्याचे स्पष्ट केले. सर्व कार्यकर्त्यांनी जल्लोषात या निर्णयाचे स्वागत करून खासदारकीच्या शुभेच्छा दिल्या.
गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीचे उमेदवार आ. लंके असतील का? याबाबत शंका व्यक्त होत होती. आ. लंके महायुतीमध्ये अजित पवार गटात होते. त्यामुळे महायुतीच्या भाजप उमेदवारासाठी प्रतिस्पर्धी उमेदवार नसला आणि असला तरी तो दखल घेण्यापर्यंत नसेल, अशी महायुतीची मानसिकता होती. मात्र, आ. लंके यांच्यावर अजित पवार गटाकडून खूप दबाव टाकण्यात आला. त्यांना आमदारकी सोडावी लागेल, अशी धमकी देण्यात आली होती. त्यामुळे आ. लंके माघार घेतील, असे वाटत होते. पण आ. लंके यांनी या दबावाला बळी न पडता शरद पवार गटाकडून लोकसभा निवडणूक लढविण्याची तयार ठेवली.
गेल्या अडीच ते तीन वर्षांपासून आ. लंके लोकसभेचे उमेदवार म्हणून महाविकास आघाडीत चर्चेत होते. राज्यातील राजकीय समीकरणे बदलली, पण आ. लंके यांचा मानस बदलला नाही. त्यानुसार त्यांनी आमदारकीवर पाणी सोडून थेट लोकसभेच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय आज जाहीर केला.