Lok Sabha Election 2024 । आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. अशात लोकसभा निडवणुकीतील ठाणे जिह्यातील कल्याण मतदारसंघ गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आला आहे.
ठाणे जिल्ह्यातील कल्याण लोकसभा मतदारसंघ हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांचा आहे. अशात महायुतीचा उमेदवार म्हणून त्यांच्याच नावाची शिंदे गटाकडून चर्चा आहे. तर दुसरीकडे शिवसेना फुटीनंतर ठाकरे गटाने ही कल्याण लोकसभेला टार्गेट करत श्रीकांत शिंदेंच्या विरोधात तगडा उमेदवार देणार असल्याची घोषणा केली आहे. आनंद दिघे यांच्या कुटूंबातील व्यक्ती केदार दिघे यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वारंवार आपल्या भाषणात आनंद दिघे यांचे नाव घेत असतात. ते म्हणतात, आनंद दिघे यांच्या विचारांचे आपण वारसदार आहोत. त्यांच्या विचारांवर आधारित आपण राजकारण आणि समाजकारण करतो.’ अशात आनंद दिघे यांच्या कुटुंबातून शिंदे गटाच्या विरोधात निवडणूक लढली जाण्याची शक्यता आहे.
या चर्चांवर वृत्तवाहिनीशी बोलतांना केदार दिघे म्हणाले,’मला या बाबत काहीही कल्पना नाही, मला तिकीट दिली जाण्याची चर्चा आहे म्हणून… पण आजपर्यंत माझी पक्षप्रमुखांशी कोणतीही वैयक्तिकरित्या चर्चा झालेली नाही. त्यामुळे यावर बोलणं योग्य ठरणार नाही.’
ते पुढे म्हणाले, शिवसेना पक्षात आधीपासूनची परंपरा आहे की पक्षातील वरिष्ठांचा आदेश आला की त्याचं पालन केलं जातं. त्यामुळे मला जर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आदेश दिला तर मी त्याचं पालन करेन. ही निवडणूक लढण्यास कोणतीही हरकत नसेल. मला तसा कोणताही निरोप अद्याप आलेला नाही. पण जर तसा आदेश आला तर नक्कीच त्याचं पालन करेन.’ असेही ते म्हणाले आहे.
हे वाचलं का ? मोदींच्या घरच्या मतदारसंघातच भाजपला झटका; दोनदा निवडून आलेल्या उमेदवाराची ‘या’ कारणामुळे ‘माघार’