T20 World Cup 2024 : नासाऊ काउंटी स्टेडियम 106 दिवसांत बांधले अन् आता 6 आठवड्यांत हटविणार…

Nassau County Stadium – पहिल्यांदाच एखादी क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेचे यजमानपद भूषविणाऱ्या आणि क्रिकेट या क्रिडाप्रकारासाठी नुकतेच बाळसं धरलेल्या अमेरिकेतली नासाऊ काउंटी क्रिकेट स्टेडियम पुढील 6 आठवड्यांत उद्ध्वस्त केले जाणार आहे. ज्यानंतर येथे फक्त उद्यान दिसणार आहे. मात्र, विश्वकरंडकादरम्यान वापरलेले आऊटफिल्ड आणि खेळपट्टी अबाधित राहणार आहे.
वास्तविक, अमेरिकेत आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम नव्हते. त्यामुळे येथे मॉड्यूलर स्टेडियम बांधण्यात आले. हे क्रिकेटचे पहिले मॉड्यूलर स्टेडियम होते. म्हणजेच त्याची खेळपट्टी आणि स्टँड एका स्पर्धेसाठी एकत्र केले गेले. मैदानाच्या जागेवर पूर्वी एक मैदाना होते, जे स्पर्धेसाठी वापरण्यात आले.
टी-२० विश्वकरंडकाचे अमेरिकेत होणारे 16 पैकी 15 सामने शनिवारपर्यंत खेळले गेले आहेत. आता फ्लोरिडात केवळ एक सामना बाकी आहे. यानंतर सुपर-8 ते फायनलपर्यंतचे सर्व सामने वेस्ट इंडिजमध्ये खेळवले जाणार आहेत. त्यामुळे आता हे तात्पुरते स्टेडियम हटवण्याचे कामही सुरू झाले आहे.
टी-२० विश्वातील सर्वांत संथ मैदान…
या मैदानाच्या संथ आउटफिल्डवर आणि ड्रॉप-इन खेळपट्ट्यांच्या असामान्य उसळीवर येथे खेळल्या गेलेल्या आठ सामन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर टीका झाली. मैदानाचा संथपणा इतका होता की, त्याची नोंद आता टी-20 विश्वातील सर्वांत संथ मैदान म्हणून झाली आहे. येथील टी-20 विश्वकरंडक सामन्यांमध्ये सरासरी धावगती प्रति षटक फक्त 5.74 धावा अशी होती, जी स्पर्धेच्या इतिहासातील 38 ठिकाणांपैकी सर्वांत कमी आहे. विश्वकरंडकात या मैदानावर प्रति षटक 6 पेक्षा कमी धावा झाल्या आहेत.
ऑस्ट्रेलियातून मागविल्या खेळपट्ट्या…
विशेष म्हणजे, नासाऊ काउंटी स्टेडियममध्ये ड्रॉप-इन खेळपट्टी वापरली गेली होती. जी ऑस्ट्रेलियात बनवली गेली होती. या वर्षी जानेवारीमध्ये 10 खेळपट्ट्या समुद्रामार्गे अमेरिकेतील फ्लोरिडा येथे आणण्यात आल्या होत्या, जिथे 5 महिन्यांच्या तयारीनंतर त्या नासाऊ स्टेडियममध्ये बसवण्यात आल्या होत्या.





