लखनौ – लोकसभा पोटनिवडणुकीसाठी रामपूर मतदारसंघातून समाजवादी पक्षाचा उमेदवार बदलण्यात आला आहे. समाजवादी पक्षाने सोमवारी आझमगड आणि रामपूर जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर केली होती. आझमगडमधून माजी खासदार धर्मेंद्र यादव, तर आझम खान यांच्या पत्नी तंजीन फातिमा यांना रामपूरमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र आता रामपूर मतदारसंघातून तंजीन फातिमा यांच्या जागी असीम रझा यांना सपाचे उमेदवार बनवण्यात आले आहे.
खुद्द आझम खान यांनी समाजवादी पक्षाच्या कार्यालयात पोहोचून ही घोषणा केली. असीम रझा हे सपाचे रामपूर शहराध्यक्ष आहेत. रझा हे आझम खान यांच्या जवळचे आहेत. रामपूर जागेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वीच उमेदवार बदलण्यात आला आहे.
आझम खान आपल्या पत्नीला लोकसभेत पाठवणार असल्याची चर्चा होती, मात्र उमेदवारी अर्जाची वेळ संपण्याच्या तासाभरापूर्वी असीम रझा यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
भाजपबद्दल बोलायचे झाले तर, पक्षाने पुन्हा एकदा भोजपुरी अभिनेता ‘निरहुआ’ला आझमगड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. ‘निरहुआ’ने 2019 ची लोकसभा निवडणूकही याच जागेवरून लढवली होती. मात्र, आझमगडमध्ये समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्याविरुद्ध निरहुआ यांचा पराभव झाला होता.
रामपूर मतदारसंघातून भाजपने घनश्याम लोधी यांना उमेदवारी दिली आहे. खरेतर, केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी यापूर्वी रामपूर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती आणि एकदा ते जिंकले होते. मात्र यावेळी ते या जागेवरून लढण्यास फारसे इच्छुक नव्हते, अस सुत्रांनी सांगितलं.