विश्रांतवाडी -नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यासाठी लोहगाव येथील 6 एकर जागेत 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय व निवासस्थान बांधकाम करण्यात येत आहे. सद्यस्थितीत 90 टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. रुग्णालयाची कामे जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
याबाबतचा आढावा उपमुख्यमंत्री पवार यांनी मंत्रालयात घेतला. यावेळी आमदार सुनील टिंगरे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुते, पुण्याचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण उपस्थित होते. दरम्यान, येरवडा आणि हवेली येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची उभारणी जलद गतीने करावी. या संस्थांमध्ये स्थानिक उद्योगांसाठी उपयुक्त अभ्यासक्रम सुरू करावेत, असे निर्देशही पवार यांनी दिले.
या विद्यार्थ्यांना “इंडस्ट्री 4.0′ अंतर्गत रोबोटिक्स, सीएनसी मशीन हॅंडलिंग, मेकॅनिक्स यासारखे अभ्यासक्रम उपलब्ध करून द्यावेत. मंजूर पदांपैकी निकडीची पदे तत्काळ भरण्याची प्रक्रिया सुरू करा,असे निर्देशही पवार यांनी दिले. या बैठकीची मागणी वडगावशेरी मतदारसंघाचे आमदार सुनील टिंगरे यांनी केली होती.