पराग शेणोलकर
कराड – कराड व मलकापूरसह शहरालगतची 11 गावे तसेच ज्या गावात करोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत, त्या गावात कटेनमेंट झोन जाहीर केला आहे. या काळात फक्त दवाखाने, दुध, गॅस सेवा वगळता सर्व काही बंद आहे. याचा सर्वामोठा फटका ग्रामीण भागातील शेतकऱ्याला बसला असून शहरातील पशु मेडिकल बंद असल्याने आजारी दुपती जनावरे औषधाअभावी दगावत आहेत. डॉक्टर आहेत, परंतु, त्यांच्याकडे औषध नाही. त्यामुळे कराड तालुक्यातील पशुधन धोक्यात आले आहे.
कराड तालुक्यात करोना बाधितांचा आकडा नावानाव वाढत आहे. वाढत्या करोना संक्रमनाला रोखण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कराड, मलकापरसह लगतच्या गवात कंटेनमेंट झोन जाहीर केला आहे. या क्षेत्राशिवाय ज्या गावात करोनाबाधित रूग्ण आढळला आहे, त्या गावातही शंभर टक्के लॉकडाऊन करण्यात आला आहे.
यात कराड शहराचा पूर्ण भाग, मलकापूर नगरपरिषद क्षेत्र, कोयनावसाहत, कापील, गोळेश्वर, कार्वे, नांदलापूर, जखिणवाडी, बनवडी, सैदापूर, ओगलेवाडी, गोटे, मुंढे, वारूंजी आदी गावांचा समावेश आहे. शिवाय रेठरे बुद्रक येथे करोनाची बाधा झालेल्या रूग्ण आढळून आलेल्या रेठरे बुद्रुकसह पंचक्रोशीत सर्व गावे लॉकडाऊन झाली आहेत.
दरम्यान, शहरातील काही उपनगरात लोक शेती करतात. शिवाय त्यांचे गोटेही आहेत. तसेच शहराच्या आजूबाजूला असणारी तसेच तालुक्यातील सर्व गावात बहुतांश शेतकरी वास्तव्यास आहे. शेतीवाडीसह त्यांची दुपती जनावरे आहेत. तर अनेकांचा दुधदुपते हा प्रमुख व्यवसाय आहे. त्यामुळे गाय, म्हैस, शेळी, मेंढी तसेच अन्य पाळीव प्राणी तालुक्यातील संख्या काही हजारांच्या घरात आहे. अनेक शेतकऱ्यांचे मोठे गोटे आहेत. अनेकांनी शासनाच्या विविध योजनातून शेळी, मेंढी, कुकुटपालन व्यवसायाला आपला प्रमुख व्यवसाय बनवले आहे.
मात्र, जिल्हाधिकारी यांच्या आदेशानंतर शहरातील पशू मेडिकल बंद आहेत. याचा सर्वात मोठा फटका सर्वसामान्य शेतकऱ्याला बसला आहे. आजारी जनावरांना औषध मिळत नाही. अनेक जनावरे अत्यावस्त आहेत. अनेक दुपत्या जनावरांना सिमेंन्स द्यायचे आहे. उष्मा वाढल्याने जनावरे विविध आजाराने त्रस्त आहेत. जनावरे, शेळया, मेढयांसह कोंबडी, पाळीव प्राणी आदींचे लसीकरण बंद आहे. कराड तालुक्यात सुमारे 200 ते 250 पशूवैद्यकीय डॉक्टर आहेत. शिवाय शहरात पशुवैद्यकीय दवाखाना आहे. मात्र त्यांना औषधासाठी शहरातील पुश मेडिकलवर अवलंबून रहावे लगत आहे. जनावरांची औषधे मिळणारी दुकाने अथवा मेडिकल फक्त शहरातच आहेत. आणि ती बंद आहेत. त्यामुळे अनेक जनावरे उपचार व औषधाविना अखेरीची घटका मोजत आहेत. त्यामुळे कराड तालुक्यातील पशुधनाचा विचार करून मर्यादित वेळेसाठी पशु मेडिकल सुरू करण्याची मागणी होत आहे.
पशुवैद्यकीय सेवा देण्यासाठी आम्ही तयार आहे. परंतु, कटेनमेंट झोनमुळे कराड शहरातील सर्व पशु मेडिकल बंद आहेत. औषध मिळत नसल्याने उपचारात अडचणी येत आहेत. तसेच औषधाअभावी पशुधन दगावण्याचा धोका निर्माण झाला आहे. यासाठी पशुवैद्यकीय विभागाला जिल्हा प्रशासनाने मुभा द्यावी, तसेच औषध साठ उपलब्ध करून द्यावा.
डॉ. उमेश थोरात,पशुवैद्यकीय डॉक्टर, कार्वे.