इस्लामाबाद – भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये झालेल्या करारानुसार पाकिस्तानने त्यांच्या देशातील अणु प्रकल्पांची यादी भारताला सादर केली आहे. दोन्ही देश या करारानुसार नियमीतपणे आपल्या देशात कार्यरत असलेल्या अणु प्रकल्पांची माहिती एकमेकांना सादर करीत असतात.
दोन्ही देशांमध्ये 31 डिसेंबर 1988 रोजी हा करार झाला होता. भारतीय उच्चायुक्त कार्यालयाच्या प्रतिनिधीला पाकिस्तानी विदेश मंत्रालयाच्यावतीने ही यादी सादर करण्यात आली आहे. सकाळी साडे दहा वाजता त्यांनी ही यादी सादर केल्यानंतर भारतीय विदेश मंत्रालयानेही भारतातातील अणू प्रकल्पांची यादी सकाळी अकरा वाजता पाकिस्तानी उच्चायुक्त कार्यालयातील प्रतिनिधींना सादर केली.
करारानुसार दोन्ही देशांनी आपआपल्या देशातील अणु प्रकल्पांची यादी एकमेकांना दरवर्षी एक जानेवारी रोजी सादर करण्याचे ठरले आहे. 1992 पासून दोन्ही देश ही प्रथा पाळत आले आहेत.