जेजुरी – अवघ्या विश्वावर असलेले करोनाचे संकट टळू दे, सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे, परिस्थिती पूर्वपदावर येऊ दे, राज्यातील मंदिरे लवकर खुली होऊ दे असे साकडे गणरायाला घालण्यात आले.
कुलदैवत खंडेरायाच्या गडकोट आवारात भक्तीपूर्ण व मंगलमय वातावरणात गणरायाचे आगमन होत प्रतिष्ठापना करण्यात आली. शनिवारी (दि.22)सकाळी 10वाजण्याच्या सुमारास देवसंस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप, व्यवस्थापक सतीश घाडगे, पर्यवेक्षक गणेश डिखळे, संतोष खोमणे, तात्या लांघी, सुनील देशमाने, सुनील भोसले आदी कर्मचाऱ्यांसह विश्वस्त शिवराज झगडे व पुजारी -सेवेकरी यांच्या उपस्थितीमध्ये सर्व धार्मिक विधी पार पाडत खंडोबा गडकोट आवारात गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली.
करोनामुळे दि. 18 मार्चपासून सर्व मंदिरे बंद आहेत. तर सर्वच धार्मिक, सांस्कृतिक, सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध आहेत, असे असले तरी प्रशासनाने घालून दिलेल्या सूचना व आदेशांचे पालन जेजुरीतील नागरिकांनी मंगलमय वातावरणात व भक्तीभावाने लाडक्या बाप्पांचे स्वागत केले.
दारात रांगोळी, सनई -चौघड्याचे सूर, टाळाचा निनाद, आरतीचे सूर, गणेश स्तोत्र, धूप-अगरबत्तीचा सुंगध आदींसह गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, आबालवृद्धांच्या घोषणांनी सारे वातावरण भक्तीमय झाले होते.