अवसरी (वार्ताहर) – अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील भोकरशेत,चवरे एलभर मळा परिसरात दोन बछडे व एक मादी बिबट्या फिरताना दिसत असल्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. या बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी श्रीहरी हिंगे व बापू येलभर यांनी केली आहे.
भोकर शेत परिसरातील सतीश हिंगे यांच्या घराजवळ सोमवारी नागरिकांना दिवसभरात तीन वेळा बिबट्या व त्यांचे दोन बछडे मनसोक्त फिरताना आढळले. त्यामुळे या परिसरातून नागरिकांना वावरताना धोक्याचे वाटत आहे.
या परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरी वस्ती आहे, त्याचबरोबर शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही याचा धोका निर्माण झाला असल्याने या बिबट मादी व दोन बछड्याचा बंदोबस्त करण्याची मागणी भोकर शेत व चौरे, येलभरमळा परिसरातील नागरिकांनी केली आहे. आज दुपारी वनपाल प्रदीप कासारे व वनरक्षक दिव्या शिवचरण वनमजूर अरुण खंडागळे यांनी या परिसरात भेट देऊन या परिसराची पाहणी केली आहे.