पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – विविध राज्यांतील बड्या शहरांत जाऊन मॉलमधून ब्रँडेड कपडे चोरणारी महाविद्यालयीन तरुणांची टोळी बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे. हे सर्व तरुण राजस्थानातील आहेत. मॉलमध्ये चोरलेल्या एका कपड्याला चुकून टॅग राहिल्याने सिक्युरिटी अलर्ट वाजला. त्यामुळे ही टोळी हाती लागली. दरम्यान, बंडगार्डन पोलिसांनी केलेल्या तपासात त्यांच्याकडून आणखी एका मॉलमधील चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे.
गौरव कुमार रामकेश मिना (१९) बलराम हरभजन मिना (२९) योगेश कुमार लखमी मिना (२५ रा. जि. करौली, राजस्थान) सोनु कुमार बिहारीलाल मिना (२५ सर्व रा. जि. दौसा, राजस्थान) अशी अटक आरोपींची नावे आहेत. अटक आरोपींकडुन अद्यापपर्यंत मोटार कार व कपडे असा एकूण ५ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
आरोपी रविवारी संगमवाडी येथील रिलायन्स फॅशन फॅक्टरी मॉलमधून साहित्य घेऊन एक्झिट गेटवरून बाहेर पडत असताना सिक्युरिटी अलार्म वाजला. सिक्युरिटी गार्डनी त्यांचा पाठलाग केला असता, थोड्याच अंतरावर एक संशयित मोटार कार उभी होती. त्यामध्ये तीन जण होते.
त्यांना घेऊन सुरक्षा रक्षक पोलीस ठाण्याकडे येत असताना त्यापैकी एक पळून गेला. उर्वरीत दोघांना पोलीस ठाण्यात आणले असता, पोलीस निरीक्षक श्रीकांत निबांळकर, उपनिरीक्षक चेतन धनवडे व अंमलदार ज्ञानेश्वर बडे, शिवाजी सरक व मनोज भोकरे यांनी ताब्यातील गौरव आणि बलराम यांची कसून चौकशी केली.
त्यांच्या कारची झडती घेतली असता, सीटवर रिलायन्स मॉलमधील चोरलेले शूज व बेल्ट, तसेच कारचे डिक्कीमध्ये डिकॉथलॉन ब्रॅन्डचे पॅन्ट, शूज व टीशर्ट असा मुद्देमाल मिळाला. गुन्ह्यातील पळून गेलेला आरोपी योगेश याला फोनच्या लोकेशनवरून खडकी बाजार येथील हॉटेलमधून ताब्यात घेतले. चौथा साथीदार सोनू यास पुणे रेल्वे स्टेशन परिसरामध्ये चोरीच्या मुद्देमालासह ताब्यात घेतले.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त प्रवीणकुमार पाटील, उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त संजय सुर्वे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान पवार यांचे मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अभिजीत जाधव, उपनिरीक्षक रवींद्र गावडे यांच्या पथकाने केली.
अशी करायचे चोरी
टोळीचा मोरक्या योगेस मिना असून, ते जयपूर ते मुंबई असा विमानाने प्रवास करून मुंबई येथून ॲपद्वारे कार भाड्याने घेऊन आले होते. ते मोठ्या शहरांतील मॉलमध्ये जाऊन ब्रॅन्डेड वस्तूंचे टॅग तोंडाने तोडत असत. नंतर माल अंगावरील कपड्याच्या आतमध्ये लपवून चोरी करत.
त्यांनी लखनौ व इतर ठिकाणीही अशा चोऱ्या केल्या आहेत. यातील सोनूकुमारचे कपड्याचे दुकान आहे. योगेश हा बीएससी नर्सिंग झाला आहे, तर गौरव हा महाविद्यालयात शिक्षण घेतो. चोरलेले कपडे सोनूकुमारच्या दुकानात किंवा महाविद्यालयीन तरुणांना विकले जात होते.