नवी दिल्ली: एकीकडे नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत देशभरात निदर्शने सुरु आहेत. तर दुसरीकडे समर्थनात देखील रॅली निघत आहेत. तसेच केंद्रीय मंत्री पत्रकार परिषदेत या कायद्याशी संबंधित बारकावे जनतेसमोर समजावून सांगत असून विरोधी पक्ष या कायद्याबद्दल लोकांमध्ये संभ्रम निर्माण करीत असल्याचे म्हणत आहेत.
दरम्यान, मध्य प्रदेशातील पाथेरिया येथील बहुजन समाज पार्टीच्या (बसपा) आमदार रमाबाई परिहार यांनी नागरिकत्व कायद्याचे समर्थन केल्यामुळे पक्षाने कारवाई करून त्यांना निलंबित केले आहे. याबाबत बसपा प्रमुख मायावती यांनी ट्विटरवर माहिती दिली आहे.
मायावती म्हणाल्या, ‘बसपा हा एक शिस्तबद्ध पक्ष आहे आणि जर शिस्त तोडली गेली तर पक्षाच्या खासदार / आमदार इत्यादींवर त्वरित कारवाई केली जाते. पाथेरिया येथील बसपाच्या आमदार रमाबाई परिहार यांनी सीएएला पाठिंबा दिल्याबद्दल त्यांना पक्षातून निलंबित केले. त्यांना पक्षाच्या कार्यक्रमात भाग घेण्यासही बंदी घातली आहे.
‘बसपाने प्रथम नागरिकत्व कायद्या फूट पडणारा व असंवैधानिक असे सांगून त्याचा निषेध केला आहे. संसदेतही याविरोधात मतदान केले आणि कायदा माघारी घेण्याबाबत आदरणीय राष्ट्रपतींना निवेदन दिले आहे. तरी देखील आमदार परिहार यांनी सीएएला पाठिंबा दर्शविला. यापूर्वीही त्यांना पक्षशिस्तीचे पालन करण्याचे आदेश दिले होते,असे मायावती यांनी म्हटले आहे.