मुंबई – आज मोबाईलवर ओटीटी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून वेब सिरीज, चित्रपट पाहण्याचे प्रमाण वाढले आहे. अगदी लहान मुलेदेखील सहजपणे वेब सिरीज पाहत असतात. ओटीटीवर प्रदर्शित होणाऱ्या वेब सिरीज वा चित्रपटांबाबत कोणताही कायदा करण्यात आलेला नाही. महिला ही केवळ उपभोगाची वस्तू असल्याचे चित्र याद्वारे दाखविण्यात येत असते. महिलांचे हे ओंगळवाणे प्रदर्शन थांबविण्यासाठी राज्य सरकारने काहीतरी ठोस निर्णय घ्यायला हवा. मंगळवारी महिला दिनाच्या निमित्ताने सर्वपक्षीय महिला आमदार आणि पुरुष सदस्यांनी देखील एकत्र येऊन या मागणीला समर्थन द्यावे, असे आवाहन आमदार सरोज अहिरे यांनी केले. मंगळवारी विधानसभेत पुरवणी मागण्यांच्या चर्चेदरम्यान त्या बोलत होत्या.
सहकार, सार्वजनिक आरोग्य आणि गृहखात्याशी संबंधित पुरवणी मागण्यांवर सरोज अहिरे यांनी आपले मत मांडले. सहकार विभागाशी संबंधित मागणीवर बोलताना त्या म्हणाल्या की, “माझ्या देवळाली मतदारसंघात नाशिक सहकारी साखर कारखाना बंद आहे. मी निवडून आल्यापासून हा कारखाना सुरु करण्यासाठी प्रयत्न करत आहे. अनेकवेळा कारखान्याची निविदा काढण्यात आली. मात्र तो चालविण्यासाठी कुणीही पुढे येत नाही. तालुक्यात ऊसाचे चांगले उत्पादन होत आहे. त्यामुळे राज्यातील सहकारक्षेत्रातील मोठ्या व्यक्तींनी हा कारखाना सुरु करण्यासाठी प्रयत्न करावेत.”
तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मागण्यांविषयी बोलताना त्या म्हणाल्या की, “देवळालीमधील गिरनार येथील ग्रामीण रुग्णालयावर खूप भार येत आहे. आदिवासी समाजाचे अनेक रुग्ण या रुग्णालयावर अवलंबून आहेत. त्यामुळे या रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देऊन त्याप्रमाणे सुविधा देण्यात याव्यात. जेणेकरुन आदिवासी महिला आणि बांधवांना चांगल्या दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळतील. तसेच भगूर येथील रुग्णालय मंजुरीसाठी मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधला. त्यास लवकर मंजुरी मिळाल्यास भगूर येथील लोकांनाही आरोग्य सुविधांचा लाभ मिळेल.”