वडापुरी, (वार्ताहर) – मराठा समाजाच्या आंदोलनाचा फटका नेत्यांना इंदापूर तालुक्यातही बसत आहे. खासदार सुप्रिया सुळे यांचे इंदापुरातील कांदलगाव या ठिकाणी लावण्यात आलेले पोस्टर्स आंदोलकांनी हटवले आहेत. जोपर्यंत सगेसोयर्याच्या मुद्द्याची अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत राजकीय नेत्यांना गावात फिरू देणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.
मराठा आरक्षणाचे पडसाद आगामी लोकसभेच्या रणधुमाळीत देखील पाहायला मिळत आहेत. मराठा आरक्षणवरून मराठा समाज आक्रमक झाला आहे. इंदापूर तालुक्यातील कांदलगाव येथे सुप्रिया सुळे यांचा लोकसभेच्या प्रचारार्थ लावण्यात आलेले फ्लेक्स घोषणाबाजी करत हटवण्यात आले. जोपर्यंत आरक्षण आणि सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी नाही,
तोपर्यंत राजकीय नेते मंडळींना गावात फिरू अथवा फ्लेक्स लावू देणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. अनेक गावांमध्ये मराठा आरक्षणासाठीच्या सगेसोयर्यांच्या मुद्द्याची अंमलबजावणी जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत राजकीय नेत्यांना गावबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. या आधीच्या आंदोलनाचा फटका उपमुख्यमंत्री अजित पवारांनाही बसला होता. आता त्याचा फटका सर्वच नेत्यांना बसण्याची शक्यता आहे.