पळसदेव, (वार्ताहर) –राज्यात गोड्या पाण्यातील मासेमारीसाठी प्रसिद्ध असलेल्या यशवंत सागरातील (उजनी धरण) वडाप व पंड्याच्या साह्याने करण्यात येणार्या मासेमारीला प्रतिबंध घालण्याची मागणी स्थानिक मच्छिमारांनी निवेदनाद्वारे उजनी पाटबंधारे विभागाकडे केली आहे.
धरणात यंदा सुमारे 1 कोटी मत्स्यबीज सोडण्यात आलेले असून, त्याची पूर्ण वाढ होऊन प्रजनन वाढीसाठी उजनीतील लहान मासळीची मासेमारी करण्यावर काही वर्षे बंदी आणण्याची गरज असल्याचे मत मच्छिमार व्यक्त करत आहेत. कारवाईची भीती नसल्याने राजरोसपणे करण्यात येणारी लहान मासळीची शिकार थांबविण्याच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी इंदापूर तालुका भोई समाज संघाकडून पुणे-सोलापूर महामार्गावर भीमानगर येथे रास्ता रोको आंदोलन, पाटबंधारे कार्यालयासमोर सडके मासे टाकून अर्धनग्न अवस्थेत मोर्चा काढणार असल्याची माहिती संघाचे युवा प्रतिनिधी अनिल नगरे यांनी दिली.
यंदा उजनी धरणातील पाणी साठा जानेवारी महिन्यात मायनसमध्ये गेला. यानंतर दिड महिन्यांत उणे पातळीतील सुमारे 10 टीएमसी (उणे 18 टक्के) पाणी आतापर्यंत कमी झाले आहे. परिणामी धरणाच्या पाणलोटक्षेत्रात सध्या रात्रीच्या वेळी वडाप, पंड्याच्या साह्याने मासेमारीचे प्रकार वाढले आहेत. या मासेमारीला आळा न घातल्यास धरणातील मत्स्यबीज नामशेष होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
यामुळे आम्ही वारंवार अशा मासेमारीला आळा घालण्याबाबत शासकीय दरबारी हेलपाटे मारत असल्याचे स्थानिक मच्छिमार सांगत आहेत. काही दिवसांपूर्वीच पळसदेव येथे मच्छरदाणीसारख्या जाळीने मासेमारी करणार्यांचे साहित्य स्थानिक मच्छिमारांनी ताब्यात घेऊन त्याची होळी केली होती; परंतु अशी मासेमारी करणार्यांची संख्या मोठी असून, याकडे सरकारी यंत्रणेचे असलेले दुर्लक्ष, काहींची मिलिभगत लहान मासळीची मासेमारी करणार्यांच्या पथ्यावर पडत आहे.
कारवाईसाठी नेमलेली समिती उदासीन
धरणातील लहान मासळीच्या मासेमारीला आळा घालण्यासाठी 28 नोव्हेंबर 2023 रोजी जिल्हाधिकार्यांनी जलसंपदा, महसूल, पोलिस, मत्स्यव्यवसाय विभाग, प्रदुषण नियंत्रण मंडळ व स्थानिक मच्छीमार संघटनेच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेऊन लहान मासळीची मासेमारी करणार्यांवर कारवाई करण्यासाठी एक समिती गठीत केली आहे.
उजनी धरणाचे कार्यकारी अभियंता यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती कार्यरत असून, पुणे, नगर, सोलापूरचे सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त, दौंड, इंदापूर, माढा, करमाळा, कर्जत, श्रीगोंदा तालुक्यांचे तहसीलदार व पोलिस निरिक्षक, करमाळा, इंदापूर, भीमानगर, पळसदेव येथील भीमा उपसा सिंचन उपविभागाचे उपविभागीय अभियंता, उजनी धरण व्यवस्थापन विभागाचे उपकार्यकारी अभियंता हे सदस्य सचिव आहेत. या समितीने संयुक्तीकपणे लहान मासळीची मासेमारी करणार्यांवर कारवाई करणे अपेक्षित आहे; मात्र कारवाईच्या बाबतीत समिती उदासिन असल्याचा आरोप स्थानिक मच्छिमार करत आहेत.
परराज्यात लहान सुक्या मासळीला मागणी
परराज्यात लहान सुक्या मासळीला चांगली मागणी असून, सुमारे 350 रुपये प्रतिकिलो दराने मच्छिमारांकडून अशा सुकलेल्या लहान मासळीची खरेदी होते. यातून चांगले उत्पन्न मिळत असल्याने अशा मासेमारीला काही स्थानिक मच्छिमारही प्राधान्य देत असल्याचे समोर आले आहे. यासाठी परप्रांतिय मच्छिमार मजुरांच्या साह्याने लहान मासळीची मासेमारी केली जात आहे. ही मासळी सुकवून टेम्पोे किंवा ट्रकमधून रात्रीच्या वेळी परराज्यात पाठविली जाते.
चिलापी मासे मिळण्याचे प्रमाण घटले
एकीकडे धरणातील देशी प्रजातींच्या माशांचे अस्तित्व संपुष्टात आलेले असताना, दुसरीकडे आता चिलापी मासे मिळण्याचे प्रमाण घटले आहे. उजनीतील चिलापी मासे राज्यभर प्रसिद्ध झालेले आहेत. पुणे-सोलापूर महामार्गालगत शेकडो हॉटेल-ढाब्यांवर चिलापी माशांचे जेवणाचे ताट मिळते; मात्र लहान मासळीची मासेमारी अशीच सुरू राहिल्यास चिलापी मासे मिळणेही मुश्कील होणार आहे.
उजनी धरणातील लहान मासळीची मासेमारी करणार्यांवर काही ठिकाणी आम्ही कारवाई केलेली आहे. पळसदेव, भिगवण, कळाशी या भागात वडापच्या साह्याने मासेमारी करणार्यांचे साहित्य जप्त करुन त्यांना तंबी देण्यात आलेली आहे; परंतु पुन्हा नव्याने तोच व्यक्ती लहान मासळीची मासेमारी करताना सापडल्यास त्यावर गुन्हा दाखल केला जाणार आहे.-नितीन खाडे, अभियंता भीमा उपसा सिंचन उपविभाग पळसदेव : अधिकार्यांना निवेदन देताना मच्छीमार.