पिंपरी -महापालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पक्षांमध्ये सन्मानपूर्वक जागावाटप झाले तरच आघाडी होईल, असे सूचक विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले.
एकीकडे कॉंग्रेसकडून स्वबळाच्या गोष्टी केल्या जात असताना आता राऊत यांनीदेखील जागावाटपाबाबत सूचक विधान करत नव्या राजकीय चर्चांना जन्म दिला आहे. आगामी महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना स्वबळावर लढणार की, आघाडी करणार याबाबत विचारले असता राऊत म्हणाले, महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना तयारी करत आहे. शहर भयमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त करण्याचे मुद्दे हाती घेऊन निवडणूक लढणार आहे.
मित्रपक्षांसोबत आघाडी करायची की, स्वबळावर लढायचे याबाबत योग्य वेळी निर्णय घेऊ. सन्मानपूर्वक जागावाटप झाल्या तर महाविकास आघाडी महापालिका निवडणुका एकत्रितपणे लढेल. मात्र, याबाबत अद्याप निर्णय घेतला नाही. योग्य वेळी निर्णय जाहीर करू, असे त्यांनी सांगितले.