- लोणावळा शहर पोलिसांनी 3 दिवसांत 581 जणांवर केली दंडात्मक कारवाई
लोणावळा – करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लोणावळा शहर पोलिसांनी कारवाई मोहीम हाती घेतली आहे. गेल्या तीन दिवसांत शहर पोलिसांनी तब्बल 581 जणांवर दंडात्मक कारवाई केली. या कारवाईमध्ये 2 लाख 90 हजार रुपये दंड वसूल केला, तर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 13 पर्यटकांवर खटले दाखल करण्यात आले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांनी दिली.
लोणावळा शहरातील वाढती करोना रुग्णसंख्या ही सर्वांची चिंता वाढविणारी आहे. दिवसेंदिवस करोनाचे रुग्ण वाढत असताना नागरिक मात्र नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे चित्र दिसून येत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी नुकतेच मास्क न लावणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करा, असा आदेश प्रशासनाला दिला होता. जिल्हाधिकारी पुणे यांनी देखील तसे परिपत्रक जारी केले आहे.
या आदेशान्वे लोणावळा शहर पोलिसांनी मास्क परिधान न करणे, “फिजिकल डिस्टन्सिंग’च्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल 581 जणांवर तीन दिवसांत कारवाई करत 2 लाख 90 हजारांचा दंड वसूल केला आहे.
करोनाचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांनी शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, विनाकारण घराबाहेर पडून करोनाला आमंत्रण देऊ नये, असे आवाहन पोलीस निरीक्षक यादव यांनी केले आहे. तसेच लोणावळा शहरात पर्यटनबंदी लागू असल्याने पर्यटकांनी शहरात गर्दी करू नये अन्यथा यापेक्षाही कडक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.