मुंबई – सोनी टीव्हीचा प्रसिद्ध डान्स रिअॅलिटी शो ‘सुपर डान्सर चॅप्टर 3’ चर्चेत आहे. हा शो सद्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. सुपर डान्सर 3 च्या एका एपिसोडमध्ये एका अल्पवयीन मुलाला अश्लील प्रश्न विचारल्याने जोरदार वाद सुरु झाला आहे. यादरम्यानचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने हा वाद वाढला आहे.
जेव्हा हा वाद वाढला तेव्हा नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्सने (NCPCR) शोच्या निर्मात्यांना आणि मुलाला असा प्रश्न विचारल्याबद्दल नोटीस बजावली. आयोगाच्या वतीने वाहिनीच्या तक्रार अधिकारी शाइस्ता नक्वी यांना पत्र लिहिले आहे. ज्यामध्ये डान्स रिअॅलिटी शोचा हा भाग काढून टाकण्याची मागणी करण्यात आली आहे. आता शोचे जज अनुराग बसू यांनी यावर मौन तोडले आहे.
अनुराग बसू यांनी नुकतेच या वादावर मौन सोडले आणि याला लाजिरवाणे म्हटले, ते पुढे म्हणाले, आपण याचा बचाव करणार नसल्याचे सांगितले. अनुराग बसू यांनी ई-टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “मी याचा बचाव करणार नाही कारण मी समजू शकतो की हे पालकांसाठी किती लाजिरवाणे होते आणि मी स्वतः दोन मुलांचा पिता आहे. सुपर डान्सर हा मुलांसाठीचा डान्स रिअॅलिटी शो आहे आणि मुलं अनेकदा निरागसपणे गोष्टी सांगतात. आम्ही त्याच्यासोबत तासनतास शूट करतो आणि तेव्हा ते अनेक गोष्टी सांगतात, ज्या काही वेळा एखाद्याच्या नियंत्रणाबाहेर असतात. मी सहमत आहे की मी संभाषण अशा दिशेने नेले नसावे की मुलाने अशा गोष्टी बोलल्या पाहिजेत ज्यामुळे त्याच्या पालकांना लाज वाटेल.
“राष्ट्रीय टीव्हीवर प्रश्न विचारताना एक रेषा काढण्याची गरज आहे आणि मुलांशी संवाद साधताना देखील काळजी घेणे आवश्यक आहे. हा भाग संपादित करता आला असता, पण तो माझ्या ताब्यात नव्हता. हे महत्त्वाचे आहे की जज म्हणून आपण प्रश्न विचारताना थोडी सावधगिरी बाळगली पाहिजे. हे माझे वैयक्तिक मत आहे. मी इथे एका रिअॅलिटी शोचा जज म्हणून बोलत आहे, वाहिनीच्या वतीने नाही. ही क्लिप व्हायरल झाली आहे हे मला माहीत असल्याने परिस्थिती बाबत आपली भूमिका स्पष्ट करणे ही माझी जबाबदारी आहे असे मला वाटले.”
नुकताच सुपर डान्सर 3 चा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये जजने एका अल्पवयीन मुलाला त्यांच्या पालकांबद्दल अयोग्य आणि लैंगिक प्रश्न विचारल्याचे दाखवण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, हा एपिसोड 2019 मध्ये प्रसारित झाला होता. त्यावेळी अनुराग बासू, शिल्पा शेट्टी आणि गीता कपूर या शोमध्ये जज होते.