मुंबई – देशाच्या गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांनी वयाच्या ९२व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. लतादीदी यांच्या पार्थिवावर मुंबईतील शिवाजी पार्क मैदानात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे कुटुंबियांनी त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. लतादीदींना अखेरचा निरोप देण्यासाठी शिवाजी पार्क मैदानावर अलोट गर्दी पाहायला मिळाली. लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वातून हळहळ व्यक्त होत आहे.
लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईत दाखल झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुष्पचक्र अर्पण करत लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच मंगेशकर कुटुंबियांना धीर देत त्यांचे सांत्वन केले. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, सुप्रिया सुळे, सचिन तेंडुलकर, श्रद्धा कपूर, शाहरुख खान, आमिर खान या सिनेसृष्टीतील दिग्गजांसह, राजकीय, क्रीडा क्षेत्रातील अनेकांनी पुष्पचक्र अर्पण करत लतादीदींना श्रद्धांजली वाहिली.