मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना चित्रपटांची असलेली आवड आणि कलाकारांबाबत वाटणारा जिव्हाळा संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. मराठी चित्रपटांसाठी थिएटर्स मिळवून देणे असो वा कलाकारांच्या अडचणी सोडवणे असो राज ठाकरे नेहमीच कलाविश्वाच्या मदतीला धावून येतात. आज भारतरत्न लता मंगेशकर यांची पहिली पुण्यतिथी यानिमित्त राज ठाकरेंनी लता दीदींसाठी एक खास पोस्ट केली आहे.
“दीदींच्या निधनाला आज एक वर्ष झालं. मागच्या वर्षी नेमक्या ह्याच दिवशी, माझ्यासकट देशातील लाखो, करोडो लोकांना काहीतरी तुटल्याची भावना जाणवली. आणि ही भावना पुढे काही काळ मनात घर करून होती. पण काही काळाने दीदींच गाणं पुन्हा कानावर पडलं आणि एक जाणवलं की मूर्त स्वरूपातील दीदी गेल्या असल्या तरी अमूर्त स्वरूपातील दीदी कायम राहणार”. असं राज ठाकरे आपल्या पोस्टमध्ये म्हणतात.
“माझ्यासारख्या अनेकांना दीदींचा आवाज कधीही आणि कुठेही ऐकला तरी तो क्षणात ओळखता येईल, पण ह्यापुढे कदाचित अनेक पिढ्या सुद्धा हा आवाज कोणाचा आहे हे चटकन जरी नाही ओळखता आलं तरी तो तितकाच आत ओढत राहील, शांत करत राहील. चिरंजीवी होणं म्हणजे काय असं मला विचारलं तर मी ह्यालाच चिरंजीवित्व म्हणेन. दीदींच्या आठवणी आहेत राहतील पण त्याहून अधिक खोल त्या माझ्यासकट करोडो लोकांच्या जाणिवांमध्ये राहतील.दीदींच्या स्मृतीस माझं विनम्र अभिवादन” अशा आशयाची पोस्ट राज ठाकरेंनी केली आहे.
…लता दीदींच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.#LataMangeshkar #LataDidi pic.twitter.com/QYN3aDCWkR
— Raj Thackeray (@RajThackeray) February 6, 2023