Lalit Patil Update – अमली पदार्थ तस्कर ललित पाटील याने पळून जाण्यापूर्वी तीन महिने आधीपासूनच पसार होण्याच्या प्लॅन केला होता. ललित ससून रुग्णालयातून पळून गेला त्यावेळी त्याचा चालक सचिन वाघ त्याच्यासोबत होता, अशी माहिती पोलिस तपासातून समोर आली आहे.
ललितसह इतर आरोपींवर बंडगार्डन पोलिस ठाण्यात अमली पदार्थ तस्करी आणि न्यायालयीन कोठडीत असताना ससून रुग्णालयातून पळून गेल्याप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल आहेत.
पळून जाण्याच्या गुन्ह्यात ललितसह त्याचा चालक सचिन वाघ याला बुधवारी (ता. २९) अटक करण्यात आली आहे. त्यांना गुरुवारी (ता.३०) न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी पोलिसांनी ललितच्या प्लॅनची माहिती न्यायालयास दिली.
ललितने तीन महिनेआधीच पळून जाण्याचा प्लॅन केला होता. त्यासाठी ललित वाघ याला भेटण्यासाठी दोन ते तीन वेळा ससून रुग्णालयातून बाहेर गेला होता, असे पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या रिमांड रिपोर्टमध्ये नमूद केले आहे.
या गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी ए. सी. बिराजदार यांनी ललितला सात दिवस आणि वाघ याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
दोघांचे परराज्यात पलायन…
ललित पळून गेला तेव्हा वाघ त्याच्यासोबत होता. पुण्यातून दोघेही सोबत परराज्यात गेले होते. पळून जाण्यापूर्वी दोघे एकमेकांच्या संपर्कात होते. ललितला पळून जाण्याच्या कटात वाघने मदत केली.
पैसे आणि कार उपलब्ध करून दिली, असा युक्तिवाद करत गुन्ह्याच्या सखोल तपासासाठी आरोपींनी पोलिस कोठडी सुनावण्याची मागणी सहायक सरकारी वकील नीलिमा यादव-इथापे यांनी केली