कॉंग्रेसच्या हरियाणातील प्रदेशाध्यक्षपदी कुमारी सेलजा

नाराज हुडा यांच्याकडे दोन महत्त्वाच्या पदांची जबाबदारी
नवी दिल्ली: कॉंग्रेसने बुधवारी हरियाणातील प्रदेशाध्यक्षपदी माजी केंद्रीय मंत्री कुमारी सेलजा यांची नियुक्‍ती केली. त्याचवेळी नाराज असलेले माजी मुख्यमंत्री भुपिंदरसिंह हुडा यांच्याकडे दोन महत्त्वाच्या पदांची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यांना हरियाणा विधानसभेतील विरोधी पक्षनेता आणि निवडणूक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष करण्यात आले आहे.

हरियाणा विधानसभेची निवडणूक तोंडावर आली असतानाच प्रदेश कॉंग्रेसमधील गटबाजी उफाळून आल्याचे चित्र निर्माण झाले. ती गटबाजी संपुष्टात आणण्याच्या उद्देशातून प्रदेश कॉंग्रेसमध्ये महत्वाचे फेरबदल करण्यात आले. मागील काही दिवसांपासून हुडा आणि त्यांच्या समर्थकांनी आक्रमक पवित्रा स्वीकारला. त्यांनी अशोक तन्वर यांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटवण्यासाठी मोहीम हाती घेतली. हुडा यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात यावी, अशी त्यांच्या समर्थकांची आग्रही मागणी होती.

मात्र, कॉंग्रेस नेतृत्वाकडून त्याची दखल घेतली जात नसल्याने हुडा यांनी पक्षाबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली. त्यापार्श्‍वभूमीवर, प्रदेश कॉंग्रेसमध्ये फेरबदल करण्यात आले आहेत. हुडा यांची प्रदेशाध्यक्ष बनण्याची इच्छा पूर्ण झाली नसली तरी त्यांच्यावर महत्त्वाची दुहेरी जबाबदारी सोपवण्यात आली. त्यामुळे हुडा यांची नाराजी दूर होणार का, ते आगामी काळात स्पष्ट होईल.

Leave A Reply

Your email address will not be published.