पंजाबमध्ये फटाका कारखान्यात स्फोट; 18 जणांचा मृत्यू

चंडीगढ: पंजाबमधील एका फटाक्‍याच्या कारखान्यात बुधवारी भीषण स्फोट होऊन 18 जण मृत्युमुखी पडले. गुरदासपूर जिल्ह्यातील बटालामध्ये घडलेल्या त्या दुर्घटनेनंतर कोसळलेल्या कारखान्याच्या ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची शक्‍यता वर्तवण्यात आली.

स्फोट झाला तो कारखाना निवासी भागात होता. स्फोटाची तीव्रता प्रचंड असल्याने लगतच्या काही इमारतींचेही नुकसान झाले. गंभीर जखमी झालेल्या 14 जणांपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. स्फोटानंतर तातडीने मदत आणि बचाव कार्य हाती घेण्यात आले. त्या कार्यात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलही (एनडीआरएफ) सहभागी झाले. दुर्घटनेची माहिती समजल्यानंतर जिल्हा प्रशासन आणि पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली. दरम्यान, दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग आणि गुरदासपूरचे भाजप खासदार सनी देओल यांनी दु:ख व्यक्‍त केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.