सातारा – सातारा शहरात हातात कोयता घेऊन दहशत माजविणारी टोळी पुन्हा सक्रिय झाली असून बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास मोळाचा ओढा येथील एका हॉटेलमध्ये जेवण देण्यास नकार दिल्याच्या कारणातून हातातील कोयता नाचवून तीन ते चार जणांनी दहशत माजविली. यातील एका संशयिताला अटक करण्यात आली आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार हॉटेल बंद झाल्याने जेवण देण्यास व्यवस्थापनाने नकार दिल्याने या टोळीतील सदस्यांनी दारूच्या नशेत चिडून जाऊन कर्मचाऱ्यांवर हातातील शस्त्राने वार करण्याचा प्रयत्न केला. वार चुकवत हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी पळ काढल्याने कोणी जखमी झाले नाही. या टोळीने हॉटेलबाहेर उभ्या असलेल्या दुचाकीची कोयत्याने तोडफोड केली.
यावेळी हॉटेलमध्ये जेवण करत असलेल्या ग्राहकांनीही भीतीने पळ काढला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दरम्यान, या भागात पोलिसांची रात्रगस्त वाढवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. पुन्हा एकदा हातात शस्त्र घेऊन दहशत करणारी टोळी सक्रिय झाल्याने व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण झाले आहे. हातात शस्त्र घेऊन दहशत माजविणाऱ्यांचा सीसीटीव्हीच्या आधारे शोध घेऊन पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे. त्याच्या इतर साथीदारांचा शोध पोलीस घेत असल्याचे साताऱ्याचे उपअधीक्षक किरणकुमार सूर्यवंशी यांनी सांगितले.