नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे; बाधितांवर तातडीने उपचार, परिपूर्ण खबरदारी
कोरेगाव (प्रतिनिधी) – जिहे आणि तडवळे संमत कोरेगावच्या कनेक्शनमुळे कोरेगाव शहरात करोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. शहरातील करोनाग्रस्तांवर उपचार सुरु असून, करोनाचा फैलाव होऊ नये यासाठी पूर्ण खबरदारी घेऊन उपाययोजना करण्यात आल्या आहेत. आ. महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शहर पूर्णत: करोनामुक्त करण्याचा ठाम निर्धार केला असून, त्यादृष्टीने पावले उचलली आहेत, अशी माहिती प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांनी दिली.
तब्बल 120 दिवस करोनापासून लांब असलेल्या कोरेगाव शहरात गेल्या दहा दिवसांपूर्वी शिरकाव केला. जिहे, ता. सातारा येथील वयोवृध्द महिला रुग्णाच्या संपर्कातून खाजगी रुग्णालयातील परिचारिकेला करोनाची बाधा झाली, त्यातून शहरात करोनाचा प्रादुर्भाव वाढत गेला. आ. महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली प्रशासकीय यंत्रणेबरोबरच नगरपंचायतीची पूर्ण टिम 24 तास कार्यरत राहिल्याने करोनाची साखळी तोडण्यात यश आले.
करोनापासून थोडासा दिलासा मिळतो ना मिळतो, तोच तडवळे संमत कोरेगाव येथील एका रुग्णामुळे आणखी एका खाजगी रुग्णालयातील परिचारिकेला करोनाची बाधा झाली. ही परिचारिका शहराच्या अगदी मध्यवस्तीत वास्तव्यास असल्याने अनेकांचे धाबे दणाणले होते. संबंधित परिचारिकेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आ. महेश शिंदे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर रात्रीपासून मी स्वत: आणि नगरसेविका शुभांगी बर्गे, माजी उपसरपंच राहूल बर्गे यांनी प्रशासकीय आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबरच स्वत: थांबून रुग्णाला तातडीने उपचारार्थ दाखल केले. त्याची कॉन्ट्रक्ट हिस्ट्री काढून, हाय रिस्क आणि अन्य संपर्कातील व्यक्तींना क्वॉरांटाइन केले.
रुग्ण वास्तव्यास असलेल्या परिसरात नगरपंचायतीच्यावतीने निर्जंतुकीकरण करुन घेत, प्रभागातील घरोघरी प्रतिकार शक्ती वाढविणारी औषधे वितरीत केली आहेत. केवळ प्रभागात लक्ष केंद्रीत न करता, संपूर्ण शहरातून करोनाला हद्दपार करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून यासाठी खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांची मदत देखील घेतली जात असल्याचेही राजाभाऊ बर्गे यांनी सांगितले.
शहरासाठी स्वतंत्र 24 तास हेल्पलाईन
संपूर्ण शहर हेच कुटुंब मानले आहे, त्यामुळे कुटुंबाची काळजी घेत प्रत्येक नागरिकावर लक्ष केंद्रीत केले असून, स्वतंत्र हेल्पलाईन 24 तास कार्यान्वित करण्यात आली आहे. हेल्पलाईनचे मोबाईल क्रमांक 9921575863 व 9637171712 हे आहेत. या हेल्पलाईनवर कॉल आल्यानंतर तातडीने माहिती घेऊन पावले उचलली जात आहेत. प्रभागाबरोबरच शहरात स्वयंसेवकांची टिम 24 तास कार्यरत केली असून, ज्यांना आरोग्यविषयी त्रास होत आहे, कोणतीही लक्षणे जाणवतात, अशांची माहिती संकलीत केली जात आहे. आरोग्य विभाग आणि नगरपंचायतीचे अधिकारी व कर्मचारी तैनात असून, एकूणच करोनाला हद्दपार केल्याशिवाय शांत बसणार नाही, असेही प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांनी स्पष्ट केले.