नातेपुते-शिंगणापूर घाट वाहतुकीसाठी खुला

गोंदवले (प्रतिनिधी) – करोनाच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या चार महिन्यांपासून बंद असलेला शिंगणापूर-नातेपुते मार्गावरील भवानी घाट अत्यावश्‍यक सेवेसाठी खुला करण्याचे आदेश गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्याने सोलापूर प्रशासनाने रविवारी शिंगणापूर घाट वाहतुकीसाठी खुला केला आहे.

करोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शासनाच्या जिल्हाबंदी आदेशानुसार सातारा-सोलापूर जिल्हा सिमेवरील भवानी घाट सोलापूर जिल्हा प्रशासनाने बंद केल्याने शिंगणापूर-नातेपुते मार्गावरील वाहतूक मार्चपासून बंद होती. शिंगणापूर घाटरस्ता बंद असल्याने शिंगणापूर, मोही, मार्डीसह परिसरातील 10 ते 15 गावातील नागरिकांची वैद्यकीय सेवेसाठी प्रचंड गैरसोय होत असल्याचे प्रसारमाध्यमांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले होते.

गेल्या आठवड्यात राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई माण तालुक्‍याच्या दौऱ्यावर आल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते आणि माण तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष दीपक तंडे यांच्यासह माण तालुका पत्रकार संघातील सदस्यांनी पत्रकार परिषदेत या रस्त्याबाबतचा मुद्दा गृह राज्यमंत्री यांच्यापुढे उपस्थित केला होता. याबाबत माण तालुक्‍यातील अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली असता तो रस्ता सोलापूरच्या प्रशासनाने बंद केला असल्याचे सांगण्यात आले.

यावर तात्काळ माहिती विचारात घेऊन सदर मागणीची मंत्री महोदयांनी तातडीने दखल घेऊन जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत माण तालुका परिसरातील लोकांना वैद्यकीय सेवेसाठी सुमारे 32 किमी अंतर जावे लागत असून रुग्णांचे हाल होत असल्याचे निदर्शनास आणून देत किमान रुग्णालयात जाणाऱ्या रुग्णांच्या गाड्यांना या रस्त्याने प्रवास करण्यास मुभा द्यावी, अशा सूचना करत दोन दिवसात काय कारवाई केली याबाबत खुलासा करण्याचे आदेश प्रशासनास दिले होते. त्यानंतर सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या सूचनेनुसार नातेपुतेचे सहायक पोलीस निरीक्षक युवराज खाडे यांनी शिंगणापूर घाटरस्त्यावरील मातीचे ढिगारे, काटेरी झाडे हटवून नातेपुते घाटरस्ता वाहतुकीसाठी खुला केला आहे. जवळपास चार महिन्यांनंतर शिंगणापूर-नातेपुते मार्गावरील वाहतूक सुरू झाल्याने नागरिकांची गैरसोय दूर झाली आहे. यामुळे आता नातेपुते शिंगणापूर नजीक असणाऱ्या गावातील लोकांचा अधिकचा प्रवासाचा त्रास वाचण्यास मदत होणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.