शिक्रापूर – कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील ढेरंगे वस्ती येथे एका विहिरीत पडलेल्या साळिंदर ला शिरूर वन विभाग तसेच प्राणी मित्रांच्या मदतीने जागतिक वन्यजीव दिनी जीवदान देण्यात यश आले. त्या साळिंदर ला निसर्गाच्या सानिध्यात मुक्त करण्यात आले आहे.
कोरेगाव भीमा येथील ढेरंगे वस्ती येथे सुनिल खुळे यांच्या शेतातील विहिरीमध्ये कोणता तरी प्राणी पडल्याचे नागरिकांना दिसले, त्यांनी तातडीने शिरूर विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांना माहिती दिली, त्यानंतर वनरक्षक बबन दहातोंडे, वनमजूर आनंदा हजारे, वन्य पशु पक्षी संरक्षण सामाजिक संस्थेचे शिरूर तालुकाध्यक्ष श्रीकांत भाडळे, सचिव शेरखान शेख, अमोल कुसाळकर, बाळासाहेब मोरे, वाईल्ड लाईफ वेलफेअर असोसिएशनचे साईदास कुसळ, निता गजरे, सतीश भवाळ, अर्शलान शेख, आदित्य गुप्ता, नवनाथ दरेकर यांसह आदींनी सदर ठिकाणी धाव घेतली.
विहिरीमध्ये साळिंदर पडल्याचे दिसून आले,. यावेळी प्राणी मित्रांनी विहिरीमध्ये पडलेल्या साळिंदर ला एक तासाच्या अथक परिश्रम नंतर बाहेर काढले. साळींदर ला कोणत्याही प्रकारची इजा झालेली नसल्याने त्याला तातडीने वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत निसर्गाच्या सानिध्यात मुक्त करण्यात आले.
यावेळी कचरू ढेरंगे, दादा खुळे, नारायण तुळसे यांसह आदी उपस्थित होते. जागतिक वन्यजीव दिनाच्या दिवशीच आम्हाला एका प्राण्याला जीवदान देण्यात आल्याचे समाधान मिळाले असल्याचे प्राणी मित्रांनी सांगितले.