कोल्हापूर – जागतिक स्तरावर वातावरणीय बदलामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे पर्यावरण संरक्षणाच्या जबाबदारीची जाणीव सर्वसामान्य लोकांना होणे आवश्यक आहे. त्याच पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थानच्या वतीने दिनांक 20 ते 26 फेब्रुवारी 2023 या कालावधीत कणेरी मठ येथे होत असलेल्या सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवात पर्यावरण संवर्धनाचा जागर होत असून, यामध्ये सर्व नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
कणेरी मठ येथे सिद्धगिरी संस्थानच्या वतीने सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवांतर्गत उभारण्यात आलेल्या विविध दालनांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन कार्यक्रमाच्या तयारीची माहिती घेतली.
सध्या जागतिक तापमानवाढ आणि बदलत्या हवामानामुळे होणाऱ्या दुष्परिणामांना आपल्याला सामोरे जावे लागत आहे. त्याचबरोबर जल, वायू, ध्वनी प्रदूषणाचे गंभीर परिणाम होत आहेत. पंचमहाभूतांच्या संरक्षणाबद्दल जनजागृती करणे अत्यंत आवश्यक आहे. पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी कणेरी मठ येथे घेण्यात येणारा सुमंगलम पंचमहाभूत महोत्सव अत्यंत महत्त्वपूर्ण ठरेल व या ठिकाणी भेट देऊन जाणारा प्रत्येक नागरिक पुढील काळात पर्यावरण संरक्षणासाठी प्रयत्न करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या ठिकाणी उभारण्यात आलेली आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी ही पंचमहाभूते व आयुर्वेद यावर आधारित सहा दालनांची पाहणी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केली. पंचमहाभूतांची निर्मिती, त्यांचे उपयोग, मानवाकडून पंचमहाभूतांचा होणारा दुरुपयोग आणि त्यांच्या संरक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजनांची माहिती येथील दालनांमध्ये देण्यात आली आहे.
त्रिमिती मॉडेल, माहितीपत्रक, ध्वनी व प्रकाश व्यवस्थेच्या माध्यमातून पंचमहाभूतांचे महत्त्व या ठिकाणी अत्यंत उत्कृष्टपणे दाखवण्यात येत असून, या ठिकाणी भेट देणारा प्रत्येक नागरिक हा पर्यावरण संरक्षणाचा संदेश येथून घेऊन जाईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.