कोल्हापूर – करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या स्ट्रक्चरल ऑडिटमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अंबाबाई मंदिरावर वेळोवेळी गळती बंद करण्यासाठी टाकण्यात आलेल्या कोब्याची उंची आता 5 फुटांपर्यंत पोहोचली आहे. याचे वजन सुमारे एक हजार टन असून मंदिराला मोठा धोका निर्माण झाला असल्याची माहिती स्ट्रक्चरल ऑडिटमधून उघडकीस आली आहे.
अंबाबाई मंदिर जवळपास 1500 वर्षांपूर्वीचे आहे. याबाबत अद्याप ठोस पुरावा मिळाला नाही. मात्र मंदिरात अनेक वर्षांपासून पावसाळ्यात गळती लागल्याचे पाहायला मिळत होते आणि म्हणूनच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने मंदिराचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मंदिराच्या टेरेसच्या ऑडिटचे काम पूर्ण झाले आहे. यामध्ये गंभीर आणि धक्कादायक अशी माहिती समोर आली आहे.
मंदिर गेल्या अनेक वर्षांपासून इतक्या मोठ्या प्रमाणात ओझे सोसत आहे. वारंवार गळतीमुळे शेवटी ऑडिट करण्यात आले. त्यामध्ये ही बाब समोर आली. मात्र आता याचे ओझे मंदिरावर जास्त काळ पडल्यास ते मंदिरासाठी धोकादायक ठरणार असल्याचे देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी म्हटले आहे. त्यामुळे लवकरच ऑडिट पूर्ण झाल्यानंतर ते काढण्याबाबत सर्व परवानग्या घेऊन त्याचे काम सुरू करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
कोब्याचे ओझे काढल्यानंतर अंबाबाई मंदिराचे मूळ स्वरुप सर्वांना पाहता येणार आहे. सद्या वेळोवेळी यावर टाकण्यात आलेल्या कोब्यामुळे मूळ स्वरूप दिसत नाही. मात्र ते काढल्यानंतर अंबाबाई मंदिराचे देखणं रूप सुद्धा आता समोर येणार असल्याचे इंजिनिअर सुदेश देशपांडे यांनी सांगितले. मुंबईमधील स्ट्रकवेल कंपनीला अंबाबाई मंदिराच्या ऑडिटचे काम देण्यात आले आहे.