नवी दिल्ली – यापुढे खासगी सुरक्षा रक्षकांना शारीरिक प्रशिक्षण घेणे अनिवार्य असणार आहे. यामध्ये गर्दीवर नियंत्रण, आग प्रतिरोधक आणि आयईडी शोधण्याच्या कामांचाही समावेश असायला हवा. तर खासगी सुरक्षा रक्षकांच्या एजन्सीला अंतर्गत सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापन विषयाचे 6 दिवसांचे प्रशिक्षण घ्यावे लागणार आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाने खासगी सुरक्षा रक्षकांसाठी हे नवीन नियम केले असून हे नियम तातडीने अंमलात आणले जाणार आहेत. खासगी सुरक्षा एजन्सी (नियमन) कायदा आणि खासगी सुरक्षा एजन्सींसाठीच्या कृती निर्देशांनुसार हे सुधारीत नियम लागू करण्यात आले आहेत.
यानुसार एजन्सीला सुरक्षा रक्षकांचे चारित्र्य आणि पार्श्वभुमी तपासून घ्यावी लागेल. इलेक्ट्रॉनिक डाटाच्या माध्यमातून सुरक्षा रक्षकांची गुन्हेगारी पार्श्वभुमी नसल्याची खात्री करून घ्यावी लागेल. सुरक्षा रक्षकांना किमान 100 तासांचे प्रत्यक्ष वर्ग प्रशिक्षण आणि 60 तासांचे शरीरिक प्रशिक्षण घ्यावे लागेल. हे प्रशिक्षण 20 दिवसांचे असायला हवे. सुरक्षा रक्षक म्हणून माजी सैनिक आणि माजी पोलीस कर्मचाऱ्यांना कमीत कमी 40 तासांचे वर्ग शिक्षण आणि 16 तासांचे शारीरिक प्रशिक्षण घ्यावे लागेल.
या शरीरिक प्रशिक्षणामध्ये शारीरिक सुदृढता, शारीरिक, मालमत्ता आणि इमारतींचे संरक्षण, वैयक्तिक सुरक्षा घरगुती सुरक्षा, अग्निशमन, गर्दी नियंत्रण, स्फोटक शोध, पासपोर्ट, ओळखपत्रे आणि कार्ड तपासणीच्या विषयांचा अंतर्भाव असावा, असेही या नियमांमध्ये म्हटले आहे.